संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . २१ जून २०२६
श्रीगोंदा ।प्रतिनिधी
श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातील चिखली घाट परिसरात असलेल्या ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती कंपनीवर मध्यरात्री धाडसी दरोडा टाकून लाखो रुपयांचे तांबे व इतर मौल्यवान साहित्य लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात बेलवंडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी सात सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली असून, आरोपी मूळचे उत्तर प्रदेश व बिहार राज्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दिनांक २७ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान कोळगाव गावच्या शिवारातील चिखली घाट येथे असलेल्या युको सिस्टीम ट्रान्सफॉर्मर रिपेअरिंग वर्कशॉप मध्ये ही थरारक घटना घडली होती. आरोपींनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत वर्कशॉपच्या मागील बाजूचे पत्रे उचकटून आत प्रवेश केला.
आत घुसल्यानंतर त्यांनी तेथे कार्यरत असलेले मजूर व वॉचमन सुभाष आनंदा पवार (रा. घुटेवाडी, ता. श्रीगोंदा) यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्या दोन्ही हातांना टेपने बांधून ठेवले. तसेच सकाळपर्यंत बाहेर आलात तर जीव मारू अशी धमकी देत त्यांना गप्प बसविले. त्यानंतर वर्कशॉपचे मुख्य शटर उघडून बाहेर थांबलेल्या त्यांच्या साथीदारांना आत बोलावून घेतले.
दरोडेखोरांनी वर्कशॉपमधील ट्रान्सफॉर्मरमधील महागडे कॉपर (तांबे) तसेच इतर मौल्यवान साहित्य जबरदस्तीने चोरून नेले. या घटनेनंतर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यामागील आंतरराज्य टोळीचा शोध लावला.
तपासादरम्यान नजीबउल्ला चम्मन सहा, अमितकुमार मुन्ना सरोज, रवि ब्रिजलाल अग्रवाल, सुभाषचंद्र ब्रिजलाल अग्रवाल, लालुकुमार कामेश्वर चौधरी, शिवपुजन रामकुमार अग्रहरी आणि कलामउद्दीन कमरउद्दीन ठाकुर या सात आरोपींचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाला.
दरम्यान, संबंधित आरोपी शिक्रापूर पोलीस ठाण्यातील अन्य एका गुन्ह्यात अटकेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर न्यायालयाची परवानगी घेऊन बेलवंडी पोलिसांनी आरोपींचा ताबा मिळवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासात ही टोळी महाराष्ट्रातील विविध भागांत औद्योगिक आस्थापना, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती केंद्रे व गोदामांना लक्ष्य करत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या टोळीने राज्यातील इतर जिल्ह्यांतही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे.
ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, पोलीस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विनोद पवार, आदित्य बेलेकर, चालक भाऊसाहेब शिंदे, विकास सोनवणे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील पोलीस नाईक प्रताप देवकाते, दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडू, पोलीस कॉन्स्टेबल नितीन शिंदे आणि होमगार्ड यांनी मोलाची भूमिका बजावली.
बेलवंडी पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे औद्योगिक क्षेत्रातील चोरी व दरोडेखोरांवर मोठा आळा बसणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.