अपघाताच्या गुन्ह्यात लाच घेताना तीन पोलीस कर्मचारी रंगेहाथ जेरबंद

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . १८जून २०२६

श्रीगोंदा | प्रतिनिधी

श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) धडक कारवाई करत तीन पोलीस कर्मचाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतल्याने पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. अपघाताच्या गुन्ह्याची नोंद करण्यासाठी तब्बल १० हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीनंतर ७ हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली.

या प्रकरणात दादा म्हस्के, नितीन गाडगे आणि राजेश जाधव या श्रीगोंदा पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आज दुपारी सापळा रचून करण्यात आलेल्या या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्येही चर्चेला उधाण आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या गुन्ह्याची नोंद व त्यासंदर्भातील कार्यवाही करण्यासाठी संबंधित तक्रारदाराकडे सुरुवातीला १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र तडजोडीनंतर ७ हजार रुपये स्वीकारण्याचे ठरल्यानंतर एसीबीने सापळा रचत संबंधित कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडले.

श्रीगोंदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अलीकडच्या काळात गुन्हेगारीविरोधात विविध प्रभावी कारवाया करण्यात आल्याने पोलीस ठाण्याची सकारात्मक प्रतिमा निर्माण होत असताना, या लाचखोरीच्या प्रकरणामुळे त्या प्रतिमेला धक्का बसल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. कर्तव्यदक्ष अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीवर अशा प्रकारच्या घटनांमुळे काळीमा फासला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

या प्रकरणी पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून एसीबीकडून अधिक तपास करण्यात येत आहे. एसीबीच्या या कारवाईचे सर्व स्तरातून स्वागत होत असून भ्रष्टाचाराविरोधातील लढ्यात हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Related Post