संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १९ जून २०२६
श्रीगोंदा, प्रतिनिधी
श्रीगोंदा शहर व परिसरात विना नंबर प्लेट तसेच वाहन परवान्याशिवाय फिरणाऱ्या वाहनांवर श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. सलग तीन दिवस चालविण्यात आलेल्या या मोहिमेत तब्बल 157 वाहनांवर कारवाई करून 3 लाख 20 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
गोपनीय बातमीदारामार्फत काही संशयित व्यक्ती चोरीची वाहने नंबर प्लेट काढून वापरत असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या पार्श्वभूमीवर दिनांक 17 जून ते 19 जून 2026 या कालावधीत श्रीगोंदा शहरात विशेष तपासणी मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेदरम्यान विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी करून एकूण 157 वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून आरसी बुक, इंजिन नंबर, चेसिस नंबर व इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या वाहनधारकांकडून दंड आकारून वाहनांवर तत्काळ नंबर प्लेट बसविण्यात आल्या व 140 वाहने सोडून देण्यात आली.
मात्र, 17 वाहनांच्या मालकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने ती वाहने पोलिस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
दिवसनिहाय कारवाई
17 जून 2026 : 56 वाहनांवर कारवाई, 1,08,500 रुपये दंड
18 जून 2026 : 47 वाहनांवर कारवाई, 1,10,000 रुपये दंड
19 जून 2026 : 54 वाहनांवर कारवाई, 1,02,000 रुपये दंड
एकूण : 157 वाहनांवर कारवाई, 3,20,500 रुपये दंड
श्रीगोंदा पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, वाहनांच्या पुढील व मागील बाजूस नियमाप्रमाणे नंबर प्लेट बसवाव्यात. अन्यथा मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, मनोहर खिळदकर, पवन मोहिते तसेच पोलीस कर्मचारी गुलाब मोरे, संभाजी गर्जे, आजिनाथ जाधव, गोरख जाधव व होमगार्ड जवानांनी सक्रिय सहभाग घेतला.
चोरीच्या वाहनांचा शोध घेणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.