संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १७ जून २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरातील सिद्धार्थ नगर परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या प्रकरणातील आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी तात्काळ कारवाई करत जेरबंद केले आहे. पियुष बाळासाहेब घोडके रा. सिद्धार्थ नगर, श्रीगोंदा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनांक १६ जून २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी रूपाली नितीन वायदंडे यांचे पती नितीन वायदंडे हे अचानक पोटदुखीचा त्रास झाल्याने औषध आणण्यासाठी मेडिकलकडे जात होते. त्यावेळी सिद्धार्थ नगर परिसरात आरोपी पियुष घोडके व त्याच्या एका अनोळखी साथीदाराने त्यांना अडवून पैशांच्या कारणावरून मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील एक हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे.
या घटनेबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी गेल्या असता आरोपी पियुष घोडके याने त्यांनाही अश्लील शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच कोयता दाखवून जीवे मारण्याची धमकी देत मोबाईलमध्ये चित्रीकरण करण्याबाबतही धमकावल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६११/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३५२, ३५१(२), ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपी पियुष बाळासाहेब घोडके यास ताब्यात घेतले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार आप्पा तरटे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सपोनि. गणेश अहिरे, पोउनि. सचिन लिमकर, पोलीस कर्मचारी संदीप राऊत, महादेव कोहक, विवेक दळवी आणि प्रमिला उबाळे यांनी सहभाग घेतला.
श्रीगोंदा पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे आरोपीला अल्पावधीतच अटक करण्यात यश आले असून परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले आहे.