अवैध दारू व जुगार अड्ड्यांवर एलसीबीची धडक कारवाई , ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२६ मे २०२६

प्रतीनिधी,

अहिल्यानगर : जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री व जुगार अड्ड्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत १० अवैध दारू विक्रेत्यांवर तसेच १ जुगार अड्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत एकूण ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २४ मे ते २५ मे २०२६ दरम्यान जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात आली. अवैध धंद्यांची माहिती संकलित करून कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची चार विशेष पथके तयार करण्यात आली होती.

या पथकांनी श्रीगोंदा, कोपरगाव तालुका, नेवासा, बेलवंडी, राहुरी आणि लोणी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू विक्री तसेच जुगार सुरू असलेल्या ठिकाणांची माहिती घेऊन तब्बल ११ ठिकाणी छापे टाकले. या कारवाईदरम्यान १० अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध आणि १ अवैध जुगार प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांत एकूण ११ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

                   - :चौकट :-

पोलीस ठाणेनिहाय कारवाई पुढीलप्रमाणे :

श्रीगोंदा –३ गुन्हे, मुद्देमाल ६,९२० रुपये

लोणी – ३ गुन्हे, मुद्देमाल २,९६० रुपये

राहुरी – २ गुन्हे, मुद्देमाल ७,५०० रुपये

बेलवंडी – १ गुन्हा, मुद्देमाल ३७,७३५ रुपये

कोपरगाव तालुका – १ गुन्हा, मुद्देमाल २०,२५५ रुपये

नेवासा (जुगार) – १ गुन्हा, मुद्देमाल १,१०० रुपये

एकूण ११ गुन्ह्यांमध्ये ७६ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यात कोठेही अवैध धंदे सुरू असल्याची माहिती मिळाल्यास नागरिकांनी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांचा दूरध्वनी क्रमांक ०२४१-२४१६१११ अथवा डायल ११२ वर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Post