संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .१६ जून २०२६
श्रीगोंदा, प्रतिनिधी
श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीतील गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील दोन आरोपींना श्रीगोंदा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 576/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी संतोष दिलीप डांगरे (वय 32, रा. डांगरे वस्ती, श्रीगोंदा) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार फिर्यादी, त्यांचे आई-वडील व साक्षीदार यांना गंभीर दुखापत करून जखमी करण्यात आल्याचा आरोप आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता. तपासादरम्यान आरोपी राजू मल्हारी डांगरे (वय 54) व राहुल राजू डांगरे (वय 24), दोघेही रा. डांगरे वस्ती, श्रीगोंदा यांना 14 जून 2026 रोजी अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींना श्रीगोंदा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने 17 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून इतर आरोपींच्या भूमिकेचीही चौकशी करण्यात येत आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जमुना बंजगे, पोना गहिनीनाथ यादव, पोलीस कर्मचारी विकास ढवळी व संदीप राऊत यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या कारवाईमुळे गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर कायद्याचा धाक निर्माण झाला असून श्रीगोंदा पोलिसांच्या तत्पर तपासाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.