अहमदनगर जिल्ह्यासाठी यलो अलर्ट ,नागरिक, शेतकरी आणि पर्यटकांना सतर्कतेचे आवाहन

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . ९ जून २०२६

अहिल्यानगर (प्रतिनिधी) : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यात दि. ८ जून २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस तसेच सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला असून नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाने प्रसिद्ध केलेल्या सूचनांनुसार मेघगर्जना, वीजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याच्या परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी. वीज चमकत असताना झाडाखाली किंवा झाडांच्या परिसरात उभे राहू नये. सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. तसेच विजेपासून संरक्षण आणि पूर्वसूचना मिळविण्यासाठी पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या दामिनी (Damini) मोबाईल अॅपचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वादळ आणि विजांचा कडकडाट सुरू असताना कोणत्याही प्रकारची विद्युत उपकरणे वापरू नयेत. ट्रॅक्टर, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांसारख्या धातूच्या वस्तूंपासून दूर राहावे. मोकळी मैदाने, टॉवर्स, ध्वजस्तंभ, विद्युत खांब, लोखंडी कुंपण, ट्रान्सफॉर्मर किंवा वीजवाहिन्यांच्या परिसरात थांबणे टाळावे. तसेच लटकणाऱ्या किंवा लोळणाऱ्या केबल्सपासून सुरक्षित अंतर राखावे.

जाहिरात फलक (होर्डिंग्ज) कोसळून अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता अशा ठिकाणांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. वीज चमकत असताना मोकळ्या जागेत अडकल्यास जमिनीशी कमीत कमी संपर्क ठेवून गुडघे दुमडून बसावे, हातांनी कान झाकावेत आणि डोके खाली घ्यावे, असे मार्गदर्शन करण्यात आले आहे.

धरणे, नद्या व कालव्यांच्या परिसरात पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. पाण्याच्या प्रवाहात उतरणे टाळावे तसेच धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपिटीमुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आगाऊ नियोजन करावे. काढणी केलेला शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समित्यांमध्ये विक्रीसाठी आणलेला माल सुरक्षित राहील याची काळजी घ्यावी. तसेच जनावरांचेही सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जवळच्या पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे ०२४१-२३२३८४४, ०२४१-२३५६९४०, तसेच ११२ आणि १०७७ (टोल फ्री) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता हवामान विभाग आणि प्रशासनाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवून सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Related Post