सिस्पे घोटाळ्यातील एजंटला महिलांनी भरचौकात बदडले..

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२१ मे २०२६

प्रतिनिधी

श्रीगोंदा तालुक्यात सिस्पे, इन्फिनिटी आणि बिकॉन या कंपन्यांच्या माध्यमातून शेकडो कोटी रुपयांचा कथित आर्थिक घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता गुंतवणूकदारांचा संताप उफाळून येत आहे. अनेक गुंतवणूकदारांचे पैसे अडकून पडल्याने संबंधित एजंट आणि अधिकृत भागीदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

गुरुवारी दुपारी श्रीगोंदा परिसरातील एका प्रमुख एजंटला काही महिला गुंतवणूकदारांनी भरचौकात गाठत जाब विचारला. आमचे पैसे कधी मिळणार? असा सवाल करत महिलांनी एजंटला धक्काबुक्की करत चोप दिल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कंपन्यांमध्ये मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून अनेक नागरिकांकडून लाखो रुपयांची गुंतवणूक करून घेण्यात आली होती. मात्र, काही महिन्यांपासून गुंतवणूकदारांना ना परतावा मिळत आहे, ना मूळ रक्कम. त्यामुळे अनेक कुटुंबांवर आर्थिक संकट ओढवले आहे.

या प्रकरणातील मुख्य सूत्रधार नवनाथ औताडे हा अद्याप फरार असल्याचे सांगितले जात असून, काही आरोपींना न्यायालयाकडून तात्पुरता जामीन मिळाला आहे. अनेक आरोपी तुरुंगात असून काही जण फरार असल्याने पोलिसांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीही एका माजी सैनिक एजंटला गुंतवणूकदारांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यामुळे संतप्त गुंतवणूकदार आता अधिक आक्रमक होत असल्याचे चित्र दिसत आहे.

गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे अडकून पडल्याने अनेकांनी शेती, सोने, जमीन विकून गुंतवणूक केल्याचे समोर येत आहे. लवकरच सर्व पैसे परत मिळतील, अशी आश्वासने देण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात पैसे न मिळाल्याने नागरिकांचा संताप वाढत असून, प्रशासनाने या प्रकरणात कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

Related Post