संघर्षनामा वृत्तसेवा । श्रींगोदा
दि . १९ जून २०२६
श्रीगोंदा, प्रतिनिधी
तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आलेल्या महिलांमध्ये आपापसात वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारी व गोंधळात झाल्याची घटना शुक्रवारी (दि. 19 जून) घडली. पोलीस ठाण्यासमोरच मोठ्याने आरडाओरडा व शिवीगाळ करून सार्वजनिक शांतता भंग केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 19 जून 2026 रोजी काही महिला तक्रार देण्यासाठी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांच्यामध्ये वाद निर्माण होऊन त्या एकमेकींना शिवीगाळ करत मोठ्याने आरडाओरडा करू लागल्या. पोलीस ठाण्याच्या परिसरातच सुरू झालेल्या या गोंधळामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच ड्युटीवरील पोलीस ठाणे अंमलदार पोलीस हवालदार संभाजी शिंदे तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी व्यवहारे व पोलीस कॉन्स्टेबल राहुल शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप करून भांडण मिटविले व संबंधित महिलांना ताब्यात घेतले.
महिला पोलीस कॉन्स्टेबल राणी व्यवहारे यांच्या फिर्यादीवरून रेणुका बांगर भोसले, सुप्रिया शेंडे काळे आणि छमा शेंडे काळे (सर्व रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक 617/2026, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 194(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास महिला पोलीस हवालदार जमुना बजंगे व पोलीस कॉन्स्टेबल संभाजी गर्जे हे करीत आहेत.
सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला आहे.