संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १८ जून २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरात चोरीच्या वाहनांचा शोध घेण्यासाठी श्रीगोंदा पोलिसांनी विशेष मोहीम राबवत विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनांवर धडक कारवाई केली. या मोहिमेत एकूण 49 वाहनांची तपासणी करण्यात आली असून मोटार वाहन कायद्यानुसार 94 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही व्यक्ती चोरीच्या दुचाकी वाहनांच्या नंबर प्लेट काढून त्यांचा वापर करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे श्रीगोंदा शहरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली.
दिनांक 18 जून 2026 रोजी पोलिसांनी शहरातील विविध भागांत विना नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वाहनांची तपासणी केली. तपासणीदरम्यान नंबर प्लेट नसलेली एकूण 49 वाहने पोलीस ठाण्यात आणण्यात आली. संबंधित वाहनधारकांकडून आरसी बुक सादर करून वाहनांचे इंजिन नंबर व चेसिस नंबरची पडताळणी करण्यात आली.
तपासणीत कागदपत्रे योग्य आढळलेल्या वाहनधारकांना जागेवरच नंबर प्लेट बसविण्याच्या सूचना देत दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यानंतर 34 वाहने सोडून देण्यात आली. मात्र, उर्वरित 16 वाहनधारकांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न केल्याने संबंधित वाहने पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहेत.
पोलिसांनी मोटार वाहन कायद्यानुसार विना नंबर प्लेट तसेच विना वाहन परवाना वाहन चालविणाऱ्या चालकांवर कारवाई करून एकूण 94 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
श्रीगोंदा शहर व पोलीस ठाणे हद्दीतील नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, ज्या वाहनांना पुढील व मागील बाजूस नंबर प्लेट नाही, त्यांनी तात्काळ नियमांनुसार नंबर प्लेट बसवून घ्याव्यात. अन्यथा अशा वाहनांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही मोहीम पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली.
या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, पोलीस उपनिरीक्षक मनोहर खिळदकर, पोलीस उपनिरीक्षक पवन मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल आजिनाथ जाधव, पोलीस कॉन्स्टेबल गोरख जाधव तसेच होमगार्ड जवानांनी सहभाग घेतला.
चोरीच्या वाहनांना आळा घालण्यासाठी आणि वाहनधारकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने श्रीगोंदा पोलिसांची ही मोहीम महत्त्वपूर्ण मानली जात आहे.