ढवळगाव शिवारात गावठी कट्टा विक्रीचा डाव उधळला,दोघांना बेलवंडी पोलिसांकडून अटक

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . २१ जून २०२६

श्रीगोंदा, प्रतिनिधी 

श्रीगोंदा तालुक्यातील ढवळगाव शिवारात गावठी कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून विक्रीसाठी आलेल्या दोन आरोपींना बेलवंडी पोलिसांनी धाडसी कारवाई करत अटक केली आहे. आरोपींकडून एक विनापरवाना गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 19 जून 2026 रोजी बेलवंडी पोलीस पोस्ट हद्दीतील ढवळगाव शिवारात काही इसम गावठी कट्टा विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांनी आपल्या पथकासह ढवळगाव शिवारातील हॉटेल रिलॅक्स परिसरात सापळा रचला.

दरम्यान, संशयित इसम घटनास्थळी येताच त्यांना पोलिसांची चाहूल लागली आणि त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून दोघांनाही शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपी सचिन विलास शिंदे (वय 35, रा. निंबवी, ता. श्रीगोंदा) याच्या ताब्यातून विनापरवाना गावठी कट्टा तर दीपक सिताराम शिंदे (रा. ढवळगाव) याच्याकडून दोन जिवंत काडतुसे मिळून आली.

पोलिसांनी चौकशी केली असता, हे शस्त्र व काडतुसे तुषार तांबे याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती आरोपींनी दिली. त्यानुसार बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 233/2026 अन्वये शस्त्र अधिनियम कायदा कलम 3, 7, 25 व 27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्यासह पोलीस हवालदार भाऊसाहेब यमगर, धर्मराज दहिफळे, संदीप गवारे, भाऊसाहेब शिंदे, पोलीस नाईक शरद गांगर्डे, पोलीस शिपाई कैलास शिपणकर, दादासाहेब क्षीरसागर, विकास सोनवणे, राजू भोर तसेच होमगार्ड सचिन काळाने, राहुल दिघे, राहुल धायगुडे, राहुल मासाळ, विशाल पवार आणि हनुमंत खोमणे यांनी सहभाग घेतला.

या कारवाईमुळे परिसरातील अवैध शस्त्र व्यवहारांना आळा बसण्यास मदत होणार असून बेलवंडी पोलिसांच्या कार्यक्षमतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Related Post