संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .१८ जून २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात सन २००५ मध्ये दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल २१ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. या कारवाईमुळे जुन्या गुन्ह्यांचा तपास आणि फरार आरोपींचा शोध घेण्याबाबत श्रीगोंदा पोलिसांची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीगोंदा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक २२७/२००५, भादंवि कलम ३७९ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यातील आरोपी सदाशिव बबन कायगुडे (रा. अजनूज, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध न्यायालयामार्फत उद्घोषणा करण्यात आली होती. मात्र तो गेल्या २१ वर्षांपासून फरार होता.
दरम्यान, श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी श्रीगोंदा शहरात आला आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलीस निरीक्षकांनी पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शिंदे व पथकाला आरोपीस ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्या.
त्यानुसार पोहेकॉ. संभाजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिताफीने सापळा रचून शनी चौक, श्रीगोंदा परिसरातून आरोपी सदाशिव कायगुडे यास ताब्यात घेतले. त्यानंतर त्यास पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी अटक करण्यात आली.
तब्बल दोन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या आरोपीस पकडण्यात आल्याने पोलीस दलात समाधान व्यक्त करण्यात येत असून, फरार आरोपींविरोधातील शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे समजते.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या मोहिमेत पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शिंदे, पोलीस नाईक गहिनीनाथ यादव, पोलीस कॉन्स्टेबल अमोल मरकड, विवेक दळवी, संदीप राऊत, महादेव कोहक तसेच महिला पोलीस कॉन्स्टेबल प्रमिला उबाळे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
२१ वर्षांनंतर आरोपी जेरबंद करण्यात यश आल्याने श्रीगोंदा पोलीसांच्या या कारवाईचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.