संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .१६ जून २०२६
श्रीगोंदा, प्रतिनिधी :
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या वतीने वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे तसेच गुन्हेगारी प्रवृत्तींना आळा बसावा यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत दररोज विविध वाहनांवर दंडात्मक कारवाया करण्यात येत असून वाहनांना बेकायदेशीररीत्या लावण्यात आलेल्या काळ्या काचा काढण्याची मोहीमही जोमाने सुरू आहे.
वाहतूक नियमांची पायमल्ली करणारे वाहनचालक, रोडरोमिओ, अवैध प्रवासी वाहतूक करणारे तसेच कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध श्रीगोंदा पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. शहरातील प्रमुख चौक, रस्ते आणि गर्दीच्या ठिकाणी पोलिसांकडून नियमित तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
विशेषतः वाहनांवरील काळ्या काचांमुळे गुन्हेगारी कृत्यांना खतपाणी मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन अशा वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे. याशिवाय दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करणे, चारचाकी चालकांनी सीटबेल्ट लावणे, वाहनांचे आवश्यक कागदपत्र जवळ बाळगणे आणि वाहतूक नियमांचे पालन करणे याबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे.
श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या या धडाकेबाज मोहिमेमुळे नियमभंग करणाऱ्यांमध्ये चांगलाच धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांकडून या कारवाईचे स्वागत करण्यात येत आहे.
यावेळी श्रीगोंदा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे पालन करावे, कायद्याचा आदर करावा आणि सुरक्षित व शिस्तबद्ध वाहतुकीसाठी पोलिसांना सहकार्य करावे.