संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १७ जून २०२६
श्रीगोंदा | प्रतिनिधी
श्रीगोंदा शहरातील काळकाई चौक परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेत चारित्र्याच्या संशयातून अल्पवयीन मुलीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिचा मृतदेह जंगलात नेऊन जाळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत आरोपी शुभम सुखदेव ओव्हाळ आणि त्याचे वडील सुखदेव ओव्हाळ दोघे रा. काळकाई चौक, श्रीगोंदा यांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जून २०२६ रोजी दुपारी आरोपी शुभम ओव्हाळ आणि त्याची अल्पवयीन मैत्रीण यांच्यात चारित्र्याच्या संशयावरून वाद झाला. वादाचे रूपांतर हिंसाचारात होऊन आरोपीने संतापाच्या भरात लोखंडी रॉड व फरशीने मुलीच्या डोक्यावर वार करून तिचा खून केला. त्यानंतर मृतदेह घरातच ठेवून आरोपीने केडगाव अहिल्यानगर येथे राहणाऱ्या आपल्या आई-वडिलांना घटनेची माहिती दिली.
त्यानंतर १६ जून रोजी आरोपी व त्याचे वडील यांनी मृतदेह गादीमध्ये गुंडाळून दोरीने बांधला. पुढे १७ जूनच्या मध्यरात्री वडाळी रोड परिसरातील जंगलात मोटारसायकलवरून मृतदेह नेण्यात आला. तेथे लाकडे गोळा करून मृतदेहावर पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, मुलीच्या आईने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून गुन्हा रजिस्टर क्रमांक ६१०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३, ३(५), २३८ तसेच पोक्सो कायदा कलम ३ व ४ आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पहाटे घटनास्थळी जाऊन खात्री करण्यात आली. वडाळी रोड परिसरातील जंगलात जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपी पिता-पुत्राला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
या गंभीर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे आणि पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात सपोनि. गणेश अहिरे, पोउनि. सचिन लिमकर, पोउनि. प्रवीण पाटील, तसेच पोलीस कर्मचारी सचिन लोळगे, संदीप राऊत, संदीप शिरसाठ, राहुल मोढळे, नय्युम पठाण, आनंद मैड, विवेक दळवी व साळवे यांचा सहभाग होता.