संघर्षनामा वृत्ततेवा । श्रीगोंदा
दि . ७ मे . २०२६
श्रीगोंदा । प्रतिनिधी
जीवन किती कठीण वळणावर आणून उभं करू शकतं, याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्रीगोंदा शहरातील संदीप बजरंग घोडके. वय अवघं चाळीशीच्या आसपास… घरात पत्नी, दोन लहान मुली आणि एक चिमुकला मुलगा. सुखाने संसार सुरू असतानाच नियतीने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळवला.
सन २०२३ पासून संदीप घोडके यांचे आयुष्य अक्षरशः हॉस्पिटलच्या दारात अडकून पडलं आहे. त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या असून, नियमित डायलिसिसवर त्यांचा जीव सुरू आहे. डॉक्टरांनी तातडीने किडनी प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला होता. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात २४ एप्रिल २०२६ रोजी शस्त्रक्रियेची तारीखही निश्चित झाली होती. मात्र, लाखो रुपयांचा खर्च उभा राहू न शकल्याने ऐनवेळी ही शस्त्रक्रिया थांबली आणि संदीप यांना उपचाराविना परतावे लागले.
आजाराने शरीर थकलं असलं तरी मनाने खंबीर असलेले संदीप आजही आपल्या लेकरांसाठी जगण्याची धडपड करत आहेत. माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. गहिवरलेल्या आवाजात ते म्हणाले,
मला माझ्या मृत्यूची भीती नाही… पण माझ्यामागे माझ्या मुलांचं काय होईल, ही चिंता मला रोज आतून संपवते. माझ्या मुलांनी पोरकं होऊ नये, एवढीच इच्छा आहे.
ही वेदना केवळ एका व्यक्तीची नाही, तर एका संपूर्ण कुटुंबाच्या अस्तित्वाची लढाई आहे. घरातील कर्ता पुरुष मृत्यूशी झुंज देत असताना पत्नीच्या डोळ्यात असहाय्यता आहे, तर तीन लहान मुलांच्या भवितव्यावर अंधार दाटून आला आहे.
काही मित्र, नातेवाईक आणि सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे; मात्र प्रत्यारोपणासाठी लागणारा खर्च खूप मोठा आहे. अशा वेळी श्रीगोंदा तालुक्याच्या दानशूर परंपरेवर आणि माणुसकीवरच या कुटुंबाचा विश्वास टिकून आहे.
श्रीगोंद्यातील व्यापारी, उद्योजक, सामाजिक संस्था, युवक आणि प्रत्येक संवेदनशील नागरिकाला कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे की, एक हात मदतीचा पुढे करून या कुटुंबाला आधार द्यावा.
तुमची छोटीशी आर्थिक मदत एका बापाला नवजीवन देऊ शकते आणि तीन निष्पाप मुलांच्या डोक्यावरचा बापाचा हात कायम ठेवू शकते.
मदतीसाठी बँक तपशील :
▪️ बँकेचे नाव: भारतीय स्टेट बँक (SBI)
▪️ खातेधारकाचे नाव: श्री. संदीप बजरंग घोडके
▪️ खाते क्रमांक: 34467623807
▪️ IFSC कोड: SBIN0000295
माणुसकी जिवंत ठेवा… एका कुटुंबाचा संसार वाचवा.
कृपया ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.