आपली माहिती आपणच भरा… अहिल्यानगर जिल्ह्यात स्वगणनेला उत्साहात सुरुवात

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .४ मे २०२६

अहिल्यानगर । प्रतिनिधी

राष्ट्रीय जनगणना प्रक्रियेला १ मेपासून राज्यभर प्रारंभ झाला असून, अहिल्यानगर जिल्ह्यातही स्वगणना (Self-Enumeration) मोहिमेचा उत्साहात शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते या उपक्रमाची सुरुवात झाली. नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेऊन या डिजिटल जनगणनेत सहभागी व्हावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पालकमंत्र्यांनी भरली स्वतःची माहिती :-महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त पोलीस कवायत मैदानावर आयोजित शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर स्वगणना मोहिमेचा कार्यक्रम पार पडला. यावेळी डॉ. विखे-पाटील यांनी टॅबच्या माध्यमातून घरगणनेशी संबंधित ३४ प्रश्नांची अचूक माहिती स्वतः भरली. सर्व माहिती पूर्ण केल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करताच त्यांचा सेल्फ एन्युमरेशन आयडी’ तयार झाला. अशा प्रकारे स्वतःची माहिती स्वतः भरून त्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला.

१ मे ते १५ मे या कालावधीत नागरिकांनी https://se.census.gov.in/⁠ या संकेतस्थळावर जाऊन स्वगणनेद्वारे आपली माहिती भरायची आहे.

१६ मे ते १४ जून दरम्यान ज्या नागरिकांनी ऑनलाइन माहिती भरलेली नाही, त्यांच्या घरी प्रगणक प्रत्यक्ष भेट देऊन माहिती संकलित करतील.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गीते यांसह इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱ्यांनीही स्वतःची स्वगणना पूर्ण करून या मोहिमेत सहभाग नोंदवला.

जास्तीत जास्त नागरिकांनी या डिजिटल सुविधेचा लाभ घेत राष्ट्रीय जनगणना कार्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Related Post