संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .२ मे २०२६
दौंड (प्रतिनिधी) लिंगाळी ग्रामपंचायत हद्दीतील वेताळनगर, पोपट नांदखिले वस्ती येथे दीर्घकाळ अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत राहून लहान बालकांच्या संगोपनासाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या रेखा बाळासाहेब साळवे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त भावनिक सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ, नवी दिल्ली यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शामू लोंढे यांच्यासह स्थानिक मान्यवर, ग्रामस्थ व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. साळवे यांनी आपल्या सेवाकाळात बालकांचे संगोपन, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात अत्यंत समर्पित भावनेने कार्य केले. त्यांच्या प्रेमळ मार्गदर्शनाखाली अनेक बालकांचे आयुष्य घडले असून त्यांच्या कार्याचा समाजावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम झाला आहे.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी साळवे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सेवेला अमूल्य योगदान अशी दाद दिली. तसेच त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य व आनंदी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
समाजातील बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आयुष्य वेचणाऱ्या साळवे यांचा हा सत्कार कार्यक्रम उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारा ठरला.