परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

संघर्षनामा वृत्तसेवा l नगर 

दि.१५ एप्रिल २०२५

प्रतिनिधी,

 अहिल्यानगर दि.१५- अनुसूचित जाती, विमुक्त भटक्या आणि अर्ध भटकंती जमाती, भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेश शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत असून या योजनेचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन सहायक आयुक्त प्रविण कोरगंटीवार यांनी केले आहे.


 योजनेच्या लाभासाठी विद्यार्थी भारताचा रहिवाशी असावा. विद्यार्थ्याचे वय ३५ वर्षापेक्षा अधिक नसावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपेक्षा अधिक नसावे. पदव्यूत्तर पदवी किंवा पदव्यूत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी पदवी परीक्षेत व पीएचडी अभ्यासक्रमासाठी पदव्यूत्तर परीक्षेत किमान ६० टक्के गुण असणे आवश्यक आहे. परदेशातील शिक्षण संस्था ही जागतिक क्रमवारीत ५०० च्या आत असावी. 

अनुसूचित जातीच्या ११५, विमुक्त भटक्या आणि अर्ध भटकंती  जमातीच्या ६ तर  भूमिहीन शेतमजूर आणि पारंपरिक कारागीर श्रेणीतील कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील ४ विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. 

या योजनेंतर्गत विद्यार्थ्याला विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षणाच्या फीसची पूर्ण रक्कम दिली जाते. आरोग्य विमा, व्हिसा शुल्क या बाबी परदेश शिष्यवृत्तीधारकांसाठी अनुज्ञेय असतील. विद्यार्थ्यास अमेरिका व इतर राष्ट्रांसाठी १५ हजार ४०० यु.एस. डॉलर तर यु.के. साठी ९ हजार ९०० जी.बी. पौंड इतका वार्षिक निर्वाह भत्ता अदा करण्यात येतो. विद्यार्थ्याला आकस्मिक खर्चासाठी १ हजार ५०० डॉलर तर यु.के. साठी १ हजार १०० पौंड इतकी रक्कम देण्यात येते. यामध्ये पुस्तके, अभ्यासदौरा व इतर खर्चाचा समावेश आहे. विद्यार्थ्यास परदेशात जाताना व अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर येताना विमान प्रवासाचा खर्च अनुज्ञेय राहील. 

योजनेची माहिती तसेच अर्जाचा नमुना www.nosmsje.gov.in या केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.  याबाबत अधिक माहितीसाठी योगेश तनेजा, अवर सचिव, शास्त्रीभवन, डॉ. राजेंद्रप्रसाद मार्ग, नवीदिल्ली. so-nos-msje@gov.in या ईमेल अथवा ०११-२३३८४०२३ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत दुपारी ३ ते ५ या वेळेत संपर्क साधता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

Related Post