संघर्षनामा वृत्तसेवा । कर्जत
दि .२८ मार्च २०२६
उज्वला यांजकडून,
कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, चांदे खुर्द येथे नागर फाउंडेशनच्या वतीने पक्षी वाचवा जनजागृती अभियान अत्यंत प्रेरणादायी वातावरणात राबविण्यात आले. उन्हाळ्याच्या तीव्र झळांमुळे पक्ष्यांना अन्न व पाण्याची तीव्र कमतरता भासत असून, अनेक पक्षी मृत्यूमुखी पडत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांना जीवनदान देण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या मनावर निसर्गप्रेमाचे संस्कार रुजविण्याचा उद्देश ठेवून हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांना निसर्गाचे महत्त्व आणि पक्ष्यांची पर्यावरणातील भूमिका समजावून सांगून करण्यात आली. पक्षी हे निसर्गचक्रातील अत्यंत महत्त्वाचा घटक असून ते बीजप्रसार, कीड नियंत्रण व पर्यावरण संतुलन राखण्यात मोलाची भूमिका बजावतात, याची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत देण्यात आली. तसेच निसर्गाच्या सान्निध्यात बालमन फुलते, पाखरांच्या सुरात त्याचे स्वप्न रंगते या ओळींमधून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
यानंतर शाळेच्या परिसरात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय व्हावी यासाठी विशेष भांडी बसविण्यात आली. विद्यार्थ्यांनी स्वतः पुढाकार घेऊन ही भांडी भरून ठेवण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे मुलांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण होऊन निसर्गाशी जुळलेली नाळ अधिक दृढ झाली.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बालमनावर निसर्गसंस्कार रुजत असून, त्यांच्यात दयाभाव, संवेदनशीलता आणि पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होत असल्याचे शिक्षकांनी सांगितले. शाळेतील शिक्षक व ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतुक करून पुढील काळात सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.
नागर फाउंडेशनतर्फे हा उपक्रम केवळ एका शाळेपुरता मर्यादित न ठेवता तालुक्यातील व जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये राबविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला आहे. आजच्या मुलांवर झालेले निसर्गसंस्कार हे उद्याच्या संवेदनशील समाजाची पायाभरणी ठरतील,असा विश्वास संस्थेच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.
या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी भांडी, पाणी व अन्नधान्य यांची आवश्यकता असून, समाजातील दानशूर व्यक्तींनी या कार्यात पुढाकार घेऊन आर्थिक व वस्तूरूपाने सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.