संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि. २ मार्च २०२६
प्रतिनिधी ,
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून पाच लाख रुपयांची लूट करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी सुमारे दीड वाजता कोळगाव शिवारातील सिक्रेट हार्ट इंग्लिश मीडियम स्कूलसमोरील मोकळ्या मैदानात ही घटना घडली. फिर्यादी अविनाश दिनकर शिंदे (रा. कडाचीवाडी, चाकण, ता. खेड, जि. पुणे) व त्यांचे मित्र नरेंद्र ठाकूर यांना अडीचशे ग्रॅम सोने केवळ पाच लाख रुपयांत देण्याचे आमिष दाखवून संबंधितांनी त्या ठिकाणी बोलावले.
ठरलेल्या ठिकाणी पोहोचताच अनोळखी महिला व दहा ते बारा जणांच्या टोळीने दोघांना घेरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादींकडील पाच लाख रुपये रोख रक्कम, दोन मोबाईल (आयफोन व विवो कंपनीचा) तसेच नरेंद्र ठाकूर यांच्या बॅगेतील आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स व एटीएम कार्ड असा ऐवज जबरदस्तीने हिसकावून आरोपी पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर व पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचा आढावा घेऊन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला.
दरम्यान, कोळाई मंदिराजवळ संशयित दोन इसमांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी आपली नावे
निजाम जलद्या काळे (रा. पारगाव, ता. श्रीगोंदा)
सुयोग बाजऱ्या काळे (रा. कोळगाव, ता. श्रीगोंदा)
अशी सांगितली. अंगझडती दरम्यान त्यांच्याकडून काही रोख रक्कम जप्त करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली.
आरोपींना दिनांक 5 मार्च 2026 पर्यंत न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास प्रभारी अधिकारी नंदकुमार सोनवलकर करीत आहेत.
या कारवाईत वैभव कलुबर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक, तसेच प्रवीणचंद लोखंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (कर्जत विभाग) आणि किरण कुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली बेलवंडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वी कामगिरी बजावली.
स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, तसेच अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांबाबत नागरिकांनी तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.