संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .२३ फेब्रुवारी २०२६
पिंपरी-चिंचवड येथे दिनांक २२ फेब्रुवारी २०२६ रोजी संविधान सजगता मंच पिंपरी चिंचवड व संविधान गुणगौरव समिती रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान गुणगौरव परीक्षा २०२५-२६ सन्मान पुरस्कार सोहळा व कार्यशाळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ विचारवंत मानव दादा कांबळे उपस्थित होते, महापौर रवि लांडगे यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. प्रमुख अतिथी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे ,उपायुक्त आण्णासाहेब बोदडे उपस्थित होते. संविधान अभ्यासक नुरखा पठाण सर यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संविधान जागरूकतेचे महत्त्व अधोरेखित करत नागरिकांनी संविधानाची जपणूक करण्याची जबाबदारी स्वीकारावी, असे प्रतिपादन केले.
सायकलवरून संविधानाचा जागर :-या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले रावसाहेब घोडके ,गेली अनेक वर्षे ते आपल्या सायकलच्या दर्शनी भागावर भारतीय संविधानाची उद्देशिका,महापुरुषांचे विचार, तसेच पर्यावरण संवर्धनाचे संदेश लावून गावोगावी फिरत आहेत. प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत संविधानाचे महत्त्व पटवून देणे, दरवर्षी संविधान परीक्षा आयोजित करणे आणि हे सर्व कार्य कोणतीही अपेक्षा न ठेवता तन-मन-धनाने निस्वार्थीपणे करणे -या त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना गौरव निस्वार्थ संविधान सेवेचा या हेतूने आदर्श समन्वयक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व गोल्ड मेडल असे होते.
महापुरुषांच्या विचारांचा पगडा असलेले त्यांचे व्यक्तिमत्त्व संविधान प्रचारक तसेच सामाजिक संदेश वारी आणि सायकल सवारी म्हणून ओळखले जाते. त्यांच्या कार्यामुळे संविधानाची जाणीव सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचत आहे.
चौकट
केंद्रप्रमुखांचाही गौरव :-मिशन गर्ल्स हायस्कूल येथील के. एम. घोडके यांनाही केंद्रप्रमुख म्हणून उत्कृष्ट कार्याबद्दल ट्रॉफी, सन्मानपत्र व गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले.
विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त सहभाग :-कार्यक्रमास अंकीता घोडके, पालकवर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यशाळेदरम्यान संविधानाचे मूल्य, कर्तव्यभावना, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाहीची जपणूक यांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
संविधानाचा प्रचार-प्रसार आणि महापुरुषांच्या विचारांची ज्योत प्रत्येक घरापर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने हा उपक्रम प्रेरणादायी ठरला. संविधान जागरूकतेचा हा दीपस्तंभ निश्चितच पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.