संघर्षनामा वृतसेवा । श्रीगोंदा
दि .१५ मार्च २०१५
श्रीगोंदा ।प्रतिनिधी
घरगुती गॅस सिलिंडरचा व्यावसायिक वापर रोखण्यासाठी प्रशासनाने श्रीगोंदा शहरात धडक कारवाई केली. शहरातील २३ हॉटेल्सवर शनिवारी (दि.१४) छापे टाकण्यात आले. या कारवाईत ६ हॉटेल्स तसेच एका दूध डेअरीमधून एकूण १३ घरगुती वापराचे गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या सूचनेनुसार तालुक्यात विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तहसीलदार सचिन डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नधान्य पुरवठा विभाग व पोलिसांच्या संयुक्त पथकाने श्रीगोंदा शहरात छापेमारी सुरू केली.
या कारवाईत पुरवठा निरीक्षक एस. व्ही. कोरे, कर्जतचे पुरवठा निरीक्षक योगेश बोकडे तसेच दोन पोलिस कॉन्स्टेबल यांच्या पथकाने शहरातील २३ हॉटेल्सची झाडाझडती घेतली. स्वामी कृपा मिसळ, पाटील चायनीज (मांडवगण रोड), किसान दूध डेअरी, सरस्वती स्वीट (मांडवगण रोड), अन्नपूर्णा खानावळ, सुकून चहा, श्री गणेश हॉटेल आदी ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यामध्ये घरगुती वापरासाठी असलेले १३ गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले.
तहसीलदार सचिन डोंगरे यांनी सांगितले की, गॅस वितरकांनी नियमांनुसार घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वाटप करावे. एखाद्या घरगुती ग्राहकाने व्यावसायिक वापरासाठी आपले सिलिंडर दिल्याचे आढळल्यास संबंधित गॅसधारकाचे कूपन जप्त करण्यात येईल. तसेच गॅस सिलिंडर तुटवडा काळात नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.