राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट यांची दिल्ली वारीची तयारी

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२० मार्च २०२६

प्रतिनिधी,

श्रीगोंदा : बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट हे आपल्या पदाधिकाऱ्यांसह मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी दिल्ली येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चात सहभागी होण्यासाठी सज्ज झाले आहेत.

प्रा. डॉ. मच्छिन्द्र सकटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जंतर मंतर येथे आयोजित करण्यात येणार आहे. देशभरातील मातंग समाजाचे प्रतिनिधी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.

या मोर्चाद्वारे अनुसूचित जातींचे अ, ब, क, ड असे उपवर्गीकरण तातडीने लागू करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. तसेच महान साहित्यिक व समाजसेवक डॉ. अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करावे, ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अशा मागण्याही मांडल्या जाणार आहेत.

याशिवाय, बोधेगाव येथे अण्णाभाऊ साठे आणि अमर शेख यांच्या स्मृतींना साजेसा भव्य स्मारक व सांस्कृतिक भवन उभारण्यात यावे, हीदेखील महत्त्वाची मागणी मोर्चात केली जाणार आहे. या ठिकाणी दोन्ही लोकशाहीरांनी सांस्कृतिक चळवळीचे मोठे स्वप्न पाहिले होते, त्याची पूर्तता व्हावी, अशी भावना समाजामध्ये व्यक्त होत आहे.

                         चौकट

दिनांक २३ मार्च रोजी होणाऱ्या या आक्रोश मोर्चासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते दिल्लीकडे रवाना होत असून, वसंतराव सकट हेही आपल्या सहकाऱ्यांसह सक्रिय सहभाग नोंदवणार आहेत.

या पार्श्वभूमीवर मातंग समाजात मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, या आंदोलनातून शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Post