संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि .१७ मार्च २०२६
मुंबई, प्रतिनिधी
मुंबईतील आझाद मैदान येथे आदिवासी शक्ती संघटनेच्या अध्यक्षा जयश्रीताई काळे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवार दि. १७ मार्च पासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. शबरी आदिवासी विकास महामंडळाच्या निधी वाटपात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत हे आंदोलन छेडण्यात आले आहे.
संघटनेचे पदाधिकारी प्रमोद काळे यांनी सांगितले की, जर शबरी आदिवासी विकास महामंडळाचा निधी विविध समाज घटकांना दिला जात असेल, तर इतर विकास महामंडळांच्या योजनांचा लाभही आदिवासी बांधवांना देण्यात यावा. अन्यथा हा सरळ अन्याय असल्याचा आरोप त्यांनी केला.
जयश्रीताई काळे यांनी उपोषणस्थळी बोलताना सांगितले की, शबरी नॅचरल्स, एफपीओ घोटाळा तसेच आदिवासींसाठी असलेला निधी नातेवाईक व बिगर आदिवासींना देण्यात आल्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी आदिवासी विकास आयुक्त लिना बनसोड व वरिष्ठ सल्लागार प्रशांत ब्राह्मणकर यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले. आदिवासी समाजाचा निधी बिगर आदिवासी लाभार्थ्यांना व बोगस संस्थांना दिल्याचा आरोप करत, या प्रकरणात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.