श्रद्धेचे शोषण की समाजाचा पराभव? भोंदू प्रवृत्तींच्या वाढत्या सावटाची गंभीर चेतावणी..

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२७ मार्च २०२६

संपादकीय ,

अलीकडील खरात प्रकरणामुळे समाजात एक धक्कादायक वास्तव पुन्हा समोर आले आहे. अध्यात्म, कीर्तन आणि भक्तीच्या नावाखाली काही भोंदू बाबा, वासनांध कीर्तनकार आणि नराधमांनी लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतल्याचे प्रकार उघड होत आहेत. या घटनांमुळे अशा प्रवृत्तींचे भविष्य टांगणीला लागले असले तरी, समाजाने या गंभीर प्रश्नाकडे केवळ प्रकरणापुरते न पाहता व्यापक पातळीवर चिंतन करण्याची गरज आहे.

आजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक कुटुंबे विविध समस्यांनी ग्रस्त आहेत. घरगुती अडचणी, व्यवसायिक अपयश, विवाहातील अडथळे, कौटुंबिक वाद-विवाद आणि मानसिक तणाव यामुळे अनेकजण अस्वस्थ आहेत. या अस्थिरतेचा सर्वाधिक परिणाम महिलावर्गावर दिसून येतो. अशा परिस्थितीत मार्गदर्शन, आधार आणि समाधानाच्या शोधात काही महिला भोंदू बाबांच्या संपर्कात येतात. याच संधीचा फायदा घेत काही विकृत प्रवृत्ती आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करतात.

यातील सर्वात चिंताजनक बाब म्हणजे “तेरी भी चूप, मेरी भी चूप” ही मानसिकता. भीती, लाज, सामाजिक बदनामीची भीती यामुळे अनेक पीडित महिला पुढे येत नाहीत. परिणामी, असे प्रकार अधिक फोफावत जातात. यामध्ये तोंडी प्रचाराचीही मोठी भूमिका आहे. एकमेकांच्या सांगण्यावरून अनेक महिला अशा भोंदू व्यक्तींकडे जातात आणि नकळत शोषणाच्या जाळ्यात अडकतात.

या परिस्थितीची मुळे शोधण्याची गरज आहे. समाजात अंधश्रद्धा, शिक्षणाचा अभाव, संवादाचा अभाव आणि मानसिक आरोग्याबाबतची अनास्था ही काही प्रमुख कारणे आहेत. कुटुंबप्रमुखांनी घरातील सदस्यांशी संवाद वाढवून त्यांच्या समस्या समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. महिलांना भावनिक आधार, समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास अशा प्रवृत्तींकडे वळण्याची गरज भासणार नाही.

यासोबतच शासनानेही अधिक कठोर भूमिका घेण्याची वेळ आली आहे. विद्यमान कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी, तक्रारींचे तात्काळ निवारण आणि दोषींवर कठोर कारवाई यामुळे अशा प्रवृत्तींना आळा बसू शकतो. समाजमाध्यमे आणि प्रसारमाध्यमांनीही केवळ बातम्या देण्यापेक्षा जनजागृतीची जबाबदारी पार पाडली पाहिजे.

युवा वर्गाने या प्रश्नाकडे केवळ टीकेच्या दृष्टीने न पाहता, समाजप्रबोधनाचे काम हाती घेणे गरजेचे आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकबुद्धी आणि जागरूकता यांचा प्रसार करून अंधश्रद्धेला विरोध करणे ही काळाची गरज आहे.

श्रद्धा ही व्यक्तीगत बाब असली तरी तिचा गैरफायदा घेणाऱ्यांविरुद्ध समाजाने एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे. अन्यथा, “बुवा तिथं बायांची संस्कृती” ही धोकादायक प्रवृत्ती समाजाच्या मुळांनाच पोखरू शकते. आता तरी जागे होण्याची वेळ आली आहे -नाहीतर उद्या उशीर झालेला असेल.

Related Post