अंधश्रद्धेचा अंधार की विवेकाचा प्रकाश?

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . २४ मार्च २०२६

प्रतिनिधी ,

आजच्या विज्ञाननिष्ठ आणि प्रगत युगातही समाजातील एक मोठा घटक तथाकथित बुवा-बाबा यांच्या प्रभावाखाली जात असल्याचे चित्र चिंताजनक आहे. एका बाजूला तंत्रज्ञान, शिक्षण आणि आधुनिकतेचा वेग वाढत असताना, दुसऱ्या बाजूला अंधश्रद्धेच्या गर्तेत अडकलेला समाज आपल्याला दिसतो. ही केवळ सामाजिक समस्या नसून, ती विचारशून्यता आणि नैतिक अधःपतनाचे लक्षण आहे.

भारतीय संस्कृतीत संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर ,संत गाडगेबाबा ,संत कबीर यांसारख्या संत-महंतांनी समाजाला विवेक, समता आणि मानवतेचा मार्ग दाखवला. त्यांनी कधीही अंदाधुंदीकरण शिकवले नाही, तर विचार, आत्मपरीक्षण आणि कर्म यावर भर दिला. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले ,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही शिक्षण आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांवर आधारित समाज उभारण्याचा संदेश दिला.

परंतु याच समाजात काही तथाकथित बुवा-बाबा श्रद्धेच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करताना दिसतात. बाबा गुरमीत राम रहीम, आसाराम बापू यांसारख्या प्रकरणांनी संपूर्ण देश हादरला. त्याचप्रमाणे कॅप्टन अशोक खरात याच्या कारनाम्याने एफस्टीन फाईल ची अनुभुती येते संबंधित प्रकरणानेही समाजात खळबळ उडवली आणि तथाकथित अध्यात्मिकतेच्या नावाखाली सुरू असलेल्या गैरप्रकारांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. अशा घटनांमुळे एक मूलभूत प्रश्न पुढे येतो -आपण श्रद्धा ठेवतो की आंधळेपणाने विश्वास ठेवतो?

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये एक सूक्ष्म पण अत्यंत महत्त्वाचा फरक आहे. श्रद्धा ही विवेक, नैतिकता आणि अनुभवावर आधारलेली असते; तर अंधश्रद्धा ही भीती, असुरक्षितता आणि अज्ञानातून निर्माण होते. जेव्हा माणूस स्वतःच्या कर्तृत्वावरचा विश्वास गमावतो, तेव्हा तो चमत्कारांच्या मागे धावू लागतो आणि याच क्षणी भोंदूगिरीला वाव मिळतो.

विशेषतः महिलांचा या प्रवाहाकडे वाढता कल ही चिंतेची बाब आहे. सामाजिक, कौटुंबिक आणि भावनिक तणावामुळे अनेक वेळा त्या अशा व्यक्तींच्या प्रभावाखाली येतात बळी पडतात. काही विकृत प्रवृत्ती या परिस्थितीचा गैरफायदा घेतात, आणि त्यामुळे समाजात गंभीर परिणाम दिसून येतात. म्हणूनच केवळ वैयक्तिक नव्हे, तर सामूहिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे.

तेरी भी चूप, मेरी भी चूप ही भूमिका समाजासाठी घातक ठरते. चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्या अधिक बळकट करणे होय. अन्याय, शोषण आणि ढोंगीपणाविरोधात आवाज उठवणे ही प्रत्येक सजग नागरिकाची जबाबदारी आहे.

जे स्वतःला भविष्य सांगणारे म्हणवतात, त्यांना स्वतःच्या आयुष्यातील संकटांचे भाकीत करता येत नाही, ही वस्तुस्थितीही विचार करायला लावणारी आहे. जर खरोखरच दैवी शक्ती असती, तर त्यांना स्वतःला कायद्याच्या कचाट्यात अडकण्यापासून वाचवता आले नसते का? यावरूनच या ढोंगीपणाचा खरा चेहरा उघड होतो.

आज गरज आहे ती संत, महंत आणि समाजसुधारकांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ समजून घेण्याची. त्यांच्या शिकवणुकीत अंधश्रद्धेला स्थान नव्हते, तर विवेक, प्रामाणिकपणा आणि मानवतेला सर्वोच्च स्थान होते.

समाजाने आता ठरवले पाहिजे—आपण विवेकाचा मार्ग स्वीकारणार की अंधश्रद्धेच्या अंधारात हरवणार? शिक्षण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि कायद्याची कडक अंमलबजावणी यांशिवाय या समस्येवर ठोस उपाय नाही.

शेवटी एकच सांगावेसे वाटते -श्रद्धा ठेवा, पण विवेक हरवू नका. देवावर विश्वास ठेवा, पण माणसाला देव बनवू नका. कारण जेव्हा नैतिकतेचा समतोल ढासळतो, तेव्हा बुवा असो वा सामान्य व्यक्ती -न्यायाच्या कक्षेबाहेर कोणीच राहत नाही.

Related Post