जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक रहा-डॉ.तात्याराव लहाने

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२५ मार्च २०२६

प्रतिनिधी,

जिल्ह्यातील साहित्यिक चांगल काम करत आहेत.साहित्याची चर्चा झाली पाहिजे कारण हा आद्यकवी मुकुंदराज यांचा जिल्हा आहे.जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सकारात्मक रहायला पाहिजे असा विचार प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ.तात्यासाहेब लहाने यांनी मांडला.ते तालुक्यातील पाडळी येथे गुरुवर्य लाला महाराज साहित्य नगरी मध्ये आयोजित केलेल्या आठव्या एकता मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.या वेळी व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा माजी आमदार उषाताई दराडे यांच्यासह तहसीलदार सुरेश घोळवे,सरपंच गहिनीनाथ पाखरे,माजी सरपंच रामदास हंगे,कालिकादेवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विश्वास कंधारे,अंगद दहिफळे,सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट,मच्छिंद्र मिसाळ यांची उपस्थिती होती.या वेळी पुढे बोलताना डॉ.लहाने म्हणाले की,समाज जीवनात माणसाने एकोप्याने वागायला हवं.जिल्ह्यात सध्या एकोप्याची गरज आहे.या जिल्ह्याला सांस्कृतिक वारसा आहे.दुसऱ्याचा द्वेष करू नका.त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तयार होते.संतांच साहित्य फार महत्त्वाचे असून आजारी पडल्यानंतर मी ज्ञानेश्वरी वाचली त्याचा फायदा झाला असल्याचे ते म्हणाले.मनुष्य म्हणून जीवन जगत असताना एकमेकांवर प्रेम करा.एकमेकांची उणी दुणी काढू नका.ग्रामीण भागातील वातावरण चांगलं आहे. लोकं भेटायला आल्यानंतर गावाकडचा जो रानमेवा घेऊन येतात तो कोणत्या फी पेक्षा कमी नाही.त्या प्रेमाच्या जोरावरच मी 27 वर्ष डोळ्यांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत.चांगल्या गोष्टीसाठी स्पर्धा निर्माण झाली पाहिजे.एकमेकांचे पाय ओढू नका असा सल्ला देखील त्यांनी शेवटी दिला.या वेळी एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक अनंत कराड,सचिव गोकुळ पवार,कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर,उपाध्यक्ष नितीन कैतके,माही शेख,राजेश बीडकर,लता कराड,रंजना फुंदे,नवनाथ सानप,अशोक इंगळे,मच्छिंद्र सानप यांच्यासह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Related Post