काष्टीत देहविक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा, लॉजमधून ७ महिलांची सुटका

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . १५ फेब्रुवारी २०२६ 

प्रतिनधी,

श्रीगोंदा : तालुक्यातील काष्टी येथे सुरू असलेल्या देहविक्रीच्या व्यवसायावर पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा पर्दाफाश केला. काष्टी येथील आम्रपाली लॉज अॅण्ड बार या हॉटेलवर छापा टाकून सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. ही कारवाई अहिल्यानगर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्या पथकाने शुक्रवारी (दि. १३) रात्री केली.

या प्रकरणी हॉटेल मॅनेजर रणजीत राम पुजारी (वय ३०, रा. कर्नाटक), मुकेशकुमार गुरुदयाल यादव (वय २६, रा. गया, बिहार), नागनाथ लक्ष्मण इंगळे (वय ३२, रा. निलंगा, लातूर) आणि ज्ञानेश्वर रमेश मुळीक (वय ३५, रा. शिरूर, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई : -अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, संबंधित हॉटेलमध्ये महिलांना डांबून जबरदस्तीने देहविक्री करून घेतली जात आहे. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी पंचासमक्ष डमी ग्राहक पाठविला. माहिती खरी असल्याचे निष्पन्न होताच रात्री सुमारे ८.१५ वाजता तिसऱ्या मजल्यावरील पाच खोल्यांवर छापा टाकण्यात आला.

छाप्यात अनैतिक प्रकार सुरू असल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळावरून तीन महागडे मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण २२ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विविध शहरांतील महिलांची सुटका: -या कारवाईत पुणे, मुंबई, ठाणे आणि पश्चिम बंगाल येथील सात पीडित महिलांची सुटका करण्यात आली. पैशांचे आमिष दाखवून तसेच बळजबरीने देहविक्री करून घेतली जात असल्याची माहिती पीडित महिलांनी पोलिसांना दिली.

याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास श्रीगोंदा पोलिसांकडून सुरू आहे. या कारवाईमुळे काष्टी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Related Post