श्रीगोंदा तालुक्यात शिक्षक दिन उत्साहात साजरा.

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.५सप्टेंबर २०२४

    लिंपणगाव (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त तालुक्यातील माध्यमिक; उच्च माध्यमिक व महाविद्यालयांमध्ये शिक्षक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. प्रामुख्याने तालुक्यात छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था; ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था; रयत शिक्षण संस्था; याबरोबरच तालुक्यातील अन्य शिक्षण संस्थांतील विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांकडून शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षक दिन म्हटले की; विद्यार्थी विद्यार्थिनींची आपल्या गुरु विषयी असलेली श्रद्धा आपल्यावर केलेले ज्ञानरूपी संस्कार; ज्ञानदानाचे वर्षभर पवित्र कर्तव्य बजावणारे ज्ञानवंत; गुणवंत शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडून सर्वत्र भरभरून कौतुक करत गुरुस्थानी सर्व शिक्षक बांधवांना विद्यार्थ्यांकडून आदरपूर्वक वंदन करण्यात आले.

दरम्यान तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील श्री व्यंकनाथ विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये 5 सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे नागवडे कारखान्याचे माजी संचालक व स्कूल कमिटीचे सदस्य विलासराव नाना काकडे व पुरुषोत्तम लगड यांनी विद्यालयात शिक्षक व शिक्षकेतरांचा शिक्षक दिनानिमित्त सन्मान केला. अनेक विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक; शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भूमिका बजावण्याची संधी मिळाली. आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांकडून मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आदरतीर्थ सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य आनंदा पुराने सर हे होते. 


  यावेळी विद्यार्थिनी कु .प्रतीक्षा साळवे हिने प्रास्ताविकात म्हटले आहे की; भारताचे माजी उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा 5 सप्टेंबर हा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. असे सांगत कुमारी साळवे पुढे म्हणाले की; शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून; त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगाकडे पाहण्याची सकारात्मक दुरुस्त मिळत असते. आपल्या गुरु शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस असल्याचे कुमारी साळवे हिने म्हटले आहे. 

याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी नगरे; वैष्णवी कुदाडे सुप्रिया काकडे; उदय वाळुंजकर आदी विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुरु शिष्य या विषयावर भावनिक दृष्ट्या मनोगत व्यक्त केले.  

यावेळी मार्गदर्शनपर भाषणात विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक ज्ञानदेव धायगुडे यावेळी म्हणाले की;  जीवन सुसह्य होण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला जीवनात गुरु असायला हवा. भविष्य उज्वल होण्यासाठी चांगली दिशा मिळते. आम्ही शिक्षक म्हणून ज्ञानदानाचे काम करत असताना विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच सुसंस्कारित परिपूर्ण जीवनाचे धडे देण्याचा शिक्षक म्हणून आम्ही प्रयत्न करत असतो. आज विद्यार्थ्यांनाही शिक्षकाची भूमिका समजली. विद्यार्थ्यांनी देशाच्या भवितव्यासाठी भविष्यात शिक्षक होण्याचा प्रयत्न करावा अशी अपेक्षा यावेळी धायगुडे यांनी व्यक्त केली. 


अध्यक्षीय भाषणात विद्यालयाचे प्राचार्य श्री आनंदा पुराणे सर यावेळी म्हणाले की; शिक्षकांच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा दिन हा शिक्षक दिन समजला जातो. विद्यार्थ्यांनी आज दिवसभर शिक्षक दिनानिमित्त शिक्षकाची उत्तम प्रकारे भूमिका बजावली. शालेय विद्यार्थ्यांनी भविष्यात इंजिनिअर; डॉक्टर; वकील होण्यापेक्षा शिक्षक व्हावे त्यासाठी मनाची जिद्द ठेवावी. निश्चित आपण पुढे सर्वजण देशाची उज्वल भावी पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करूया.; असे भावनिक आवाहन उपस्थित विद्यार्थ्यांना श्री पुराने यांनी केले. 


     दरम्यान विद्यालयाचे मुख्याध्यापिका म्हणून ऋतुजा का़ंडेकर या विद्यार्थिनीला शालेय प्रशासन सांभाळण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमास विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते. आभार ज्ञानेश्वरी गायकवाड या विद्यार्थिनीने मानले.

Related Post