सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी..

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.५सप्टेंबर २०२४

घोगरगाव प्रतिनिधी, 

सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी..

महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींचे महाराष्ट्राच्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक जडणघडणीत अतुलनीय योगदान आहे.

१२ व्या शतकात गुजरात मधील भडोचला सम्राट विशालदेव आणि माल्हनीदेवी यांचा एकुलता एक पुत्र हरिपाल यांचे २५ व्या वर्षी अल्प आजाराने निधन झाले. भाद्रपद शुद्ध द्वितीयेला त्या पार्थिव शरीरात परमेश्वर अर्थात सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतरले. काही दिवस भडोचला राहिल्यानंतर स्वामींनी राज्य वैभवचा त्याग केला. महाराष्ट्रात रिद्धपुरला श्रीगोविंदप्रभुला भेटले आणि एकांतवास स्वीकारला सालबर्डी परिसरात बारा वर्षे वास्तव्य करून मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात परिभ्रमण केले. समाजातील सर्व जाती-धर्मातील माणसांना सत्य, अहिंसा, समानता, अंधश्रद्धा निर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, जातीभेद उच्चाटन आदी जीवन विकासाची मूल्ये आणि मानवधर्माच्या अखंडत्वासाठी समानतेची सूत्रे साध्यासोप्या मराठी भाषेतून सांगितली.

दयनीय परिस्थितीत मानवाला मानवतेचे हक्क प्रस्थापित करून समाजाच्या शिरोभागी असलेल्या आसुरी प्रवृत्तीला नष्ट करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पादाक्रांत केला. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून एकसंध बांधले.

स्त्री स्वातंत्र्य व शिक्षण :

स्त्री स्वतंत्र्याची मुहूर्तमेढ ८०० वर्षांपूर्वी सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामींनी रोवली. स्वामींच्या सहवासात नागुबाईसा, महादाईसा, देमाईसा, आबाईसा, उमाईसा, साधाईसा, माईबाईसा, लखुबाईसा, एकाईसा, हंसूबाईसा, आउसा इत्यादी स्त्रिया मनमोकळेपणाने वागत. आपल्या मनातली शंका प्रश्न संकोच न बाळगता विचारत आणि स्वामीही त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे समर्पक उत्तर देत असत. स्वामी सर्वाशी आपुलकीने वागत. स्वामींच्या प्रेमळपणानं, मधुर बोलण्यानं, निरूपणानं, वागण्यानं ते सर्वांनाच हवेहवेसे वाटायचे. साष्टी पिंपळगाव येथील देमाईसा नावाची स्त्री गुरुशिवाय मुक्ती नाही म्हणून पैठणला गुरु करण्यासाठी येते. पण वामदेवांना नग्न बघून त्यांची गुरु करण्याची इच्छाच नष्ट होते. ती परत गावाला निघते रस्त्यात भक्त लखुबाईसा भेटते. ती स्वामींची शिष्या असते. सर्व घटना देमाईसा सांगते. लखुबाईसा म्हणते जर गुरुच करायचा असेल तर मी योग्य असा गुरु दाखवते. ज्यांच्याजवळ राहताना कसलाच संकोच वाटणार नाही. त्यांच्या सहवासात आपण दुःखातून मुक्त होऊ. अज्ञान दूर होऊन तुला सर्वच प्रश्नांची योग्य उत्तरे मिळतील. देमाईसा आणि लखुबाईसा स्वामींच्या दर्शनाला येतात. स्वामींना भेटल्यावर लखुबाईसाने सांगितलेल्या गोष्टीची खात्री पटते. ती स्वामींची शिष्या होते. निसंकोचपणे स्वामींच्या सहवासात राहू लागते. स्वामींचे बोलणे वागणे स्त्री-पुरुष समानतेचे होते. त्यामुळे स्त्रियांचे मनात आत्मविश्वास वाढत होता.

स्त्रियांबद्दल आकस असणाऱ्या आणि स्त्रियांचा अनादर करणाऱ्या सारंगपंडिताला डोमेग्रामला शिक्षा केली.

समाजात मासिकधर्मामुळे स्त्रियांना वाईट वागणूक देऊन वाळीत टाकले जाते. त्याला सुद्धा स्वामींनी विरोध करत शास्त्रशुद्ध कारण देत वरखड उत्तर दिले.

स्वातंत्र्य हीच मुक्ती आणि पारतंत्र्य हे बंधन अशा विश्वात्मक महामंत्राचे निरूपण स्वामींनी राणाईसा भक्त स्त्रीला केले. भक्त महादाईसांच्या जिज्ञासक, चर्चकवृत्तीचे कौतुक केले. त्याचाच परिणाम म्हणजे मराठी साहित्याला मिळालेली आद्य कवयित्री म्हणजेच महादाईसा आणि महदंबेचे धवळे हा काव्यग्रंथ होय. व्रतवैकल्ये, उपवास, नवससायास, तीर्थक्षेत्रांना जाऊन मासोपवास करणे अशा गुंतागुंतीच्या धर्मरूप अंधश्रद्धांतून स्वामींनी स्त्रियांना मुक्त केले.

स्वामींनी स्त्री पुरुष असा कधीच भेद केला नाही. स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला त्यामुळे स्वामींच्या पश्चातही आणि आजही अनेक स्त्रिया पंथाचे समर्थपणे नेतृत्व करत आहेत. स्वामींच्या वियोगात भान हरपलेल्या श्रीनागदेवांना जंगलातून पाठीवर उचलून आणून साध्वी महादाईसांनी अपार कष्ट घेत पंथाचे रक्षण केले. एवढेच नाही तर स्त्रियांमुळे आज मराठीतील आद्य चरित्रग्रंथ लीळाचरित्र उपलब्ध आहे. पंडित माहिमभट्ट लिखित मूळ लीळाचरित्र यवनांच्या आक्रमणात नष्ट झाल्यावर एक संदी स्मरणशक्तीच्या बळावर साध्वी हिराईसांनी पुन्हा लीळाचरित्र लिहिण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले.

समानता

विविध घटकांच्या समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे सर्व जाती धर्माचे लोक समान असतात. म्हणून सर्व वर्ण-जातीतील स्त्री-पुरुषांसाठी ज्ञानाचे दालन श्रीचक्रधरस्वार्मीनी सर्वप्रथम खुले केले. अमूक्या जातीत जन्मला म्हणून श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असा भेदभाव स्वामींनी नाकारला. गुणकर्मानुसार श्रेष्ठ-कनिष्ठ असतो. असे गीतातत्वाचे प्रतिपादन केले. तत्कालीन समाजात वर्ण विषमता खूप फोफावली होती. मानसा मानसातील दरी वाढली होती. त्याचे प्रतिबिंब लीळाचरित्रातील चर्मकारा स्थिती या लीळेत दिसते.

डोमेग्रामला श्रीगोंद्याहून आलेल्या दाको नावाच्या लोहार भक्ताने आणलेल्या सर्व वस्तू स्वामींनी सहर्ष स्वीकारल्या आणि आपल्या सोबत जेवायला बसवले.

भूतदया, अहिंसा -

स्वार्मीचे प्राणिमात्रांवर सुद्धा प्रेम होते. निसर्ग नियमानुसार जसा माणसांना जगण्याचा अधिकार आहे तसाच प्राण्यांना सुद्धा आहे हे शिकवण स्वामी भक्तांना देत असत. त्यांच्या जगण्यावर आपला हक्क नाही तर त्यांचाच हक्क आहे. भक्तीच्या नावाखाली होणाऱ्या बळी प्रथेचा विरोध करत ती भक्ती नसून देवांच्या नावाने चालणारे थोतांड आहे. ते न करता सात्विक ज्ञानयुक्त भक्तीचे प्रतिपादन स्वामींनी केले. अगदी मुंगीला सुद्धा मारू नये असा दंडक स्वामींनी दिला. प्राणीमात्रांवर दया करा. त्यांना भीती दाखवू नये, त्रास देऊ नये, मारू नये, याची अनेक उदाहरणे लीळाचरित्रात आहेत.

स्वामींच्या सहवासात घोडाचुडी शिष्य राहत होता. तो हातावर भिक्षा घेऊन ज्या घरची त्याच घरी खात असे. किष्किंद पर्वताकडे जाताना एका गावी एका बाईने चुलीवर उकळणारी गरम गरम आंबील त्याच्या हातावर टाकली. चर्रकन हाताला चटका बसला. वेदना झाल्या. त्याला खूप राग आला. पटकन आंबील चाटत त्याने तो हात घराच्या चौकटीला पुसला आणि जल जाओ असे म्हणाला. तो सामर्थ्यशाली असल्याने तिथे लगेच आग लागली. ती आग गावभर पसरली. हलकल्लोळ माजला. ते दृश्य पाहून तो विकट हास्य करत करत स्वामींकडे आला आणि म्हणाला ही आग कशी लागली माहित आहे का स्वामींनी नकारार्थी मान फिरवल्यावर त्याने हसत हसत सर्व घटना सांगितली. स्वामी नाराज झाले आणि खेद व्यक्त करत म्हणाले. तुम्ही अख्ख्या गावाला आग लावली आणि वरून हसत आहात. त्यात शेकडो जीव तडफडून, होरपळून भस्म झालेले असताना सुद्धा तुम्हाला थोडी सुद्धा की आली नाही. अशा निर्दयी माणसासोबत आम्ही क्षणभर सुद्धा राहणार नाही. स्वामी त्याला सोडून निघून गेले.

स्वार्मीजवळ एक कुत्रा होता त्याचे. नाव डांगरेश. तो सतत स्वामींसोबत राहत असे. स्वामींनी प्रसाद दिल्याशिवाय काही खात नसे. सामान सांभाळण्याचे काम करायचा. स्वामीही त्याची काळजी घेत असत. त्याचा  स्वामींवर अपार जिव्हाळा होता. एकदा स्वामी भक्तांवर रागावले सर्वांना निघून जाण्यास सांगितले. डांगरेश मात्र गेला नाही. स्वामी त्यालाही जा म्हटले. त्यामुळे प्राण्याला स्वामींची नाराजी कळाली. स्वामीभोवती प्रदक्षिणा करून तो निघून गेला. काही वेळाने सर्वजण परत आले; पण त्यांच्यासोबत डांगरेश नव्हता. स्वामींनी त्याला शोधण्यास सांगितल्यावर त्याने एका नाल्यात तोंड खूपसून जीव दिला असे भक्तांना दिसले. त्यांनी येऊन स्वामींना सांगितले. स्वामी म्हणाले अरे तुमच्यापेक्षा कुत्रा चांगला. जो आमचे रागावणे सहन करू शकला नाही. आमच्या शिवाय जगणे त्याला व्यर्थ वाटले. वियोग सहन झाला नाही. तुमच्या जगण्याला काही अर्थ नाही. स्वामींच्या वियोगात जीवन संपविणारा डांगरेश स्वामींवर किती प्रेम करत होता हे दिसते. अर्थात स्वामीही त्याच्या वर किती स्नेह करत असतील की त्याला स्वामींशिवाय जगणे अशक्य वाटले. हिंसा करू नये पण जिथे हिंसा झाली त्या स्थानाचाही त्याग करावा असा उपदेश स्वामींनी दिला. पुणतांबा गावाला ठाकूरची हत्या झाली म्हणून ते गाव सोडून स्वामी पुढील गावी निघून गेले.

प्राण्यांवर दयाभाव निर्माण होणे ही अहिंसा आहे. अहिंसेचा अंगीकार केला की मानवता जन्माला येते. जसे मुंगीला मारू नये तसेच झाडाचे पान सुद्धा तोडू नये. त्याने पाप लागते म्हणून झाडाला, प्राणीमात्रांना दुःख देऊ नये.

सर्वांशी प्रेमाने बोलावे, सत्य बोलावे. दुसऱ्याचे मन दुखवू नये. कोणी पीडित-निराश्रीत असेल तर त्याला आधार देऊन दुःख मुक्त करावे. गरज नसताना विनाकारण वस्तूंचा संग्रह करू नये. परस्परांत वैरभाव ठेवू नये. भांडण करू नये. अधिकचे आणि अनीतीचे धन जमवू नये. देवी-देवतांचा अनादर अवहेलना करू नये. प्रयत्न केल्याने सर्व काही मिळू शकते. कुणावरही अधिकार-सत्ता गाजवून त्रास देऊ नये. अन्नाचा अपव्यय टाळावा. शरीराला गरजेपुरतेच भोजन द्यावे. जास्त खाऊन रोगांना आमंत्रण देऊ नये. कर्मकांडात गुंतू नये इत्यादी स्वामींनी विश्व कल्याणकारी असणारी त्रिकालाबाधित अशी विश्वात्मक सूत्रे सांगितली.

अशा या महान समाज उद्धारक परमेश्वर अवताराचा अवतार दिन साजरा करण्याचे भाग्य आपल्या सर्वांना लाभले आहे, तरी यात आपण सक्रिय सहभाग घेऊया.

अध्यक्ष ..

श्रीगोंदा तालुका महानुभाव परिषद...

पू .श्री.अविनाश बाबा धाराशिवकर ..

घोगरगाव

Related Post