संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा
दि . १९ एप्रिल २०२६
अक्षय्य म्हणजे क्षय न पावणारे. कधीही नष्ट न होणारे. अमर, शाश्वत किंवा निरंतर. साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त अक्षय्य तृतीया. या दिवशी कोणत्याही शुभकार्यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी चिरकाल टिकते व त्यात भरभराट होते असे मानले जाते. या दिवशी केलेल्या शुभ कार्याचे फळ कधीही कमी होत नाही. ‘काल विवेक’ या ग्रंथांमध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. जैन धर्मामध्येही या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेश मध्ये या सणाला ‘आखा तीज’ तर महाराष्ट्रातील खानदेश मध्ये ‘आखाजी’ या नावाने ओळखतात. काही ठिकाणी या सणाला अक्ती असे म्हणतात.
धार्मिक पौराणिक कथेनुसार पांडवांना वनवासात असताना, श्रीकृष्णाने द्रौपदीला अक्षय्य पात्र भेट म्हणून दिले. त्यातून कधीही न संपणारे अन्न मिळत होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. महर्षी वेद व्यास यांनी याच दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. त्यावेळी लेखनिकाचे काम भगवान गणेश यांनी केले. या दिवशी भगवान शंकराने कुबेर यांना देवतांचे कोषाध्यक्ष बनवले होते. त्यामुळे या दिवशी धनाची पूजा केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्ण मित्र सुदामाला भेटले होते व त्याची दरिद्री दूर केली होती.
ज्योतिषशास्त्रात कृत, त्रेता, द्वापर आणि कलियुगाची सर्व वर्ष मिळून होणाऱ्या काळाला ‘महायुग’ म्हणतात. अक्षय्य तृतीयेला कृत युग संपून त्रेता युग सुरू झाले असे मानले जाते. या दिवशी कृषी संस्कृतीचा पालक म्हणून बलरामाची पूजा होते. या दिवशी नर, नारायण या दोन देवतांनी अवतार घेतला असे मानले जाते. भगवान विष्णूचा सहावा अवतार परशुराम यांचा जन्म या दिवशी झाला असे मानले जाते. त्यामुळे परशुरामाची पूजा केली जाते. माता अन्नपूर्णा यांचाही जन्म याच दिवशी मानला जातो. गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली अशी मान्यता आहे. जो मनुष्य गंगास्नान करेल तो पापा पासून मुक्त होतो अशी धारणा आहे.
या दिवशी भारताच्या उत्तराखंड राज्यातील बद्री नारायणाच्या बंद देवळाचे दार उघडतात. प्रसिद्ध अशा जगन्नाथ रथयात्रेचा प्रारंभ या दिवशी होतो. देवाच्या नौका विहारासाठी पाच बोटी या निमित्ताने सुशोभित केल्या जातात. महाराष्ट्रातील स्त्रिया चैत्र महिन्यात चैत्रगौरीची स्थापना करून पूजा करतात. या महिन्यात हळदीकुंकवाच्या निमित्ताने बायकांना घरी बोलावण्यात येते. हळदीकुंकू समारंभाचा अक्षय्य तृतीया हा शेवटचा दिवस असतो. या दिवशी पहाटे स्नान करून सूर्य देवाची पूजा केली जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा करण्याची मान्यता आहे. देवी लक्ष्मीला आपण धनसंपत्तीचे प्रतीक मानतो. तिची पूजा केल्याने तिची कृपादृष्टी प्राप्त होऊन घरात धनसंपत्ती, समृद्धी येते. कलश मांडूनही पूजा करतात. गोडाचा नैवेद्य देवाला अर्पण करतात. गोरगरिबांना अन्नदान करणे शुभ मानतात. पक्ष्यांना धान्य टाकणे, गरजूंना आवश्यक वस्तू दान करणे महत्त्वाचे मानले जाते. या दिवशी तुम्ही कोणत्याही स्वरूपाचे दान करू शकता. या दिवशी सोन्याची खरेदी करणे भाग्योदयाचे मानले जाते. त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास राहतो.
हा दिवस पूर्वजांचे ऋण फेडण्याचा दिवस मानला जातो. पितरांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन करतात. मातीचे मडके पाण्याने भरून त्यात वाळा टाकतात. त्यामुळे पाण्याला सुगंध प्राप्त होतो. पळसाच्या पानांपासून तयार केलेल्या पत्रावळीवर व द्रोणात तांदळाची खीर, कैरीचे पन्हे, पापड, कुरडया वाढतात. ब्राह्मणाला पाण्याने भरलेला सुगंधित घट दान करतात. यामुळे पितरांचा संतोष होतो असे मानले जाते. या दिवशी देवतेच्या कृतज्ञतेचा भाव ठेवून केलेल्या उपासनेमुळे देवतेच्या कृपादृष्टीचा क्षय होत नाही अशी समजूत आहे.
हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने या दिवशी नवीन घरात प्रवेश करणे, नवीन वस्तू घेणे, आर्थिक व्यवहार करणे अशी शुभ कामे केली जातात. नवीन वस्त्र, शस्त्र, दागिने खरेदी करतात. ब्राह्मणांना भोजन देऊन वस्त्राचे व दक्षिणादान करतात. सातूचे महत्त्व असून ते खातात. नदीत जमल्यास गंगेत वा समुद्रात आंघोळ करतात. ही तृतीया बुधवारी आल्यास व त्या दिवशी रोहिणी नक्षत्र असल्यास ती महापुण्यकारक मानली जाते
थोडक्यात सांगायचे झाल्यास नवीन कार्याची सुरुवात, शेतात भरघोस पीक यावे, सुख-समृद्धीसाठी अक्षय्य तृतीया साजरी केली जाते.
संदर्भ : नेट आधार.
डॉ. सौ. शुभांगी गणेश गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा -ठाणे
sggadegaonkar@gmail.com