मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 मध्ये अवंतिकाचे दैदिप्यमान यश

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . १२ एप्रिल २०२६

श्रीगोंदा (प्रतिनिधी) : मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, श्रीगोंदा (मुली) येथील विद्यार्थिनी अवंतिका तुषार नवले हिने उल्लेखनीय यश संपादन करत तालुक्यात प्रथम, जिल्ह्यात पाचवा तर राज्यस्तरावर दहावा क्रमांक पटकावला आहे. तिच्या या उज्ज्वल कामगिरीमुळे श्रीगोंदा तालुक्याचा शैक्षणिक लौकिक उंचावला आहे.

टाकळी कडेवळीत येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार किसनदादा नवले यांची कन्या असलेल्या अवंतिकाने सातत्यपूर्ण अभ्यास, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे कुटुंबीय, शिक्षकवर्ग तसेच मित्रपरिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अवंतिकाला तिच्या वर्गशिक्षिका प्रमोदिनी दळवी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या योग्य दिशादर्शनामुळेच अवंतिकाने या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अवंतिकाच्या या यशाबद्दल शाळा प्रशासन, ग्रामस्थ तसेच विविध स्तरांतील मान्यवरांनी तिचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या कामगिरीमुळे इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

Related Post