संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि. १ एप्रिल २०२६
प्रतिनिधी,
पेडगाव (ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) येथे महाराष्ट्रातील लुप्त होत चाललेल्या मौखिक लोकसाहित्याच्या जतनासाठी महाराष्ट्र मौखिक लोकसाहित्य संकलन व संवर्धन अभियानचा औपचारिक शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या उपक्रमाची संकल्पना पेडगावचेच ग्रामस्थ तसेच साहित्य विषयातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले साहित्यिक कृष्णा भगवान घोलप यांची आहे.
गावातील अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित कीर्तन कार्यक्रमानंतर घोलप यांनी उपस्थित ग्रामस्थ, महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिकांसमोर या उपक्रमाची माहिती मांडत मौखिक परंपरेच्या जतनाचे महत्त्व स्पष्ट केले. यावेळी प्रतिनिधी स्वरूपात काही महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते माहितीपत्रकाचे अनावरण करून उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला.
या अभियानांतर्गत पारंपरिक जात्यावरच्या ओव्या, लग्नघाणा गीते, भलरी, पंचमीच्या फेराचे प्रसंग, लोकगीते तसेच दिवाळीतील गाई-म्हशी ओवाळीची गाणी आदी मौखिक साहित्याचे संकलन करून त्याचे लिखित व डिजिटल जतन करण्यात येणार आहे. ग्रामीण संस्कृतीचा हा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
घोलप यांनी यापूर्वीच मोठ्या प्रमाणात मौखिक साहित्याचे संकलन व जतन केलेले असून, या कार्याला व्यापक रूप देण्यासाठी या अभियानाचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला आहे. उपस्थितांना त्यांनी आवाहन केले की, आपल्या माहितीत असलेले मौखिक साहित्य तसेच अशी माहिती असणाऱ्या व्यक्ती पुढे आणाव्यात, जेणेकरून हा सांस्कृतिक वारसा जतन करता येईल. या उपक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, भविष्यात तो राज्यभर राबविण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.