संघर्षनामा न्यूज़।पाथर्डी
दि. 9नोहे .2022
पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी सब स्टेशन येथून संपूर्ण परिसराला दोन फिडर वरून शेतीसाठीची लाईट पुरवली जाते, परंतु दोन्ही फिडर ओव्हरलोड असल्याने शेतीला पूर्ण दाबाने व पूर्ण वेळ लाईट मिळत नाही. यासाठी पाच एम व्ही क्षमतेचा ट्रांसफार्मर बसवावा, अशी मागणी मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांनी महावितरण कडे केली आहे.
अविनाश पालवे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, माणिकदौंडी सबस्टेशन मध्ये तीन फिडर आहेत. त्यापैकी माणिकदौंडी गावठाण एक तर माणिकदौंडी ए जी (शेतीपंप) वआल्हणवाडी ए जी (शेतीपंप) असे दोन शेती पंपाचे फिडर आहेत. माणिकदौंडी फिडरवरून माणिकदौंडी, पिरेवाडी,आठरवाडी, डमाळवाडी, जाटदेवळा, नाकाडेवाडी, सुरसवाडी, बोरसेवाडी, चितळवाडी, कोठेवाडी, लांडकवाडी, सोनाळवाडी, वंजारवाडी तर आल्हणवाडी फीडरवरून चेकेवाडी, धनगरवाडी, रुपलाचातांडा, पटेलवाडा, पत्र्याचातांडा, हरीचातांडा, घुमटवाडी, आल्हणवाडी, भापकरवाडी या गावांना शेतीची थ्री फेज लाईट पुरवली जाते, परंतु वरील दोन्ही फिडर ओव्हरलोड असल्याने लाईनवर फॉल्ट होतात व मिळणाऱ्या आठ तासांपैकी तासनतास लाईट बंद असते किंवा कमी दाबाने असते, यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देतांना फार अडचणींचा सामना करावा लागतो. परिणामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते व शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसते. तरी ही अडचण दूर होण्यासाठी माणिकदौंडी सबस्टेशन मध्ये पाच एम व्ही क्षमतेचा नवीन ट्रांसफार्मर बसवावा, ज्या मधून नवीन तीन फिडर तयार होतील. त्यापैकी एक फिडर शिरसाटवाडी, रांजणी, केळवंडी या गावांसाठी व उर्वरित दोन फिडर माणिकदौंडी परिसरातील गावांसाठी वापरून ओव्हरलोडची समस्या कायमची दूर करावी व शेतकऱ्यांना पूर्ण वेळ, पूर्ण दाबाने लाईट द्यावी, अशी मागणी सरपंच अविनाश पालवे यांनी महावितरणकडे केली आहे.