रायगडकरांची स्वप्नपूर्ती… शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास मिळाली भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

अलिबाग​​​ | संघर्षनामा न्युज 

(जिमाका) -  अखेर तो दिवस आला…रायगडकरांची स्वप्नपूर्ती झाली… अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला केंद्र शासनाच्या अखत्यारितील भारतीय आयुर्विज्ञान परिषदेची मंजूरी मिळाली असून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या शंभर विद्यार्थ्यांच्या पहिल्या तुकडीची प्रवेश प्रक्रिया यावर्षी सुरू होणार असल्याची माहिती आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी आरसीएफ शाळा, लेक्चर हॉल, कुरुळ, अलिबाग येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
       लवकरच या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी प्रवेश प्रकिया सुरू होणार असून, रायगडसह कोकणातील विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी  यावेळी केले. रायगड जिल्ह्यात आरोग्य सुविधेच्या मूलभूत हक्कांपासून कोणीही वंचित राहणार नाही आणि त्यातून आरोग्य स्वयंपूर्ण रायगड वेगाने मार्गक्रमण करताना दिसून येणार आहे. 
 पालकमंत्री कु.आदिती तटकरे म्हणाल्या की, जिल्ह्यात वैद्यकीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी अलिबाग येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 500 रुग्ण खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी आवश्यक बांधकाम, यंत्रसामुग्री व पद निर्मितीस शासनाने  मान्यता प्रदान केली आहे. त्यानुषंगाने अलिबाग तालुक्यातील मौजे ऊसर येथे एकूण 52 एकर जमीन संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई यांना नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाकरिता अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अलिबाग यांना प्रदान करण्यात आली आहे. 
   या नियोजित नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी यापूर्वी शासनाने मंत्रीमंडळ बैठकीत देण्यात आलेल्या मान्यतेनुसार आवश्यक पदनिर्मिती करण्यास उच्चस्तरीय समितीच्या मान्यतेची अटही शिथील करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्याच्याशी संलग्नित 500 रुग्णखाटांच्या रुग्णालयाकरिता पुढील चार वर्षात एकूण 1 हजार 72 पदांची निर्मिती करण्यास तसेच त्याकरिता येणाऱ्या रु.61.68 कोटी इतक्या अंदाजित खर्चास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मंजूरी दिली आहे. त्यानुसार वर्षनिहाय व पदनामनिहाय पदनिर्मिती आवश्यक असल्यामुळे या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 500 खाटांच्या रुग्णालयाकरिता नियमित 496 पदे त्याचप्रमाणे गट-क ची 99 काल्पनिक पदे आणि गट-ड ची 477 कंत्राटी पदे बाह्ययंत्रणेद्वारे, अशी एकूण 1 हजार 72 पदे 4 टप्प्यात निर्माण करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. हे वैद्यकीय महाविद्यालय तातडीने कार्यान्वित होण्यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ 44 अध्यापकांची प्रतिनियुक्तीने पदस्थापना करण्याविषयीचे आदेशही जारी करण्यात आले आहेत, असे सांगून त्या पुढे म्हणाल्या, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग सुरु करण्याकरिता भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानकांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाची जागा अपुरी असल्यामुळे राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड, थळ,अलिबाग या संस्थेच्या मौजे कुरुळ येथील वसाहतीतील जुनी शाळा, टाईप ए रेसिडन्सी क्वॉर्टरच्या सहा इमारती तसेच शाळेजवळची सहा एकर मोकळी जागा प्रति विद्यार्थी रु.2 हजार प्रति सेमिस्टर (शासकीय वसतिगृह शुल्क) अशा भाडेतत्त्वावर 3 वर्षाकरिताचा सामंजस्य करारही झाला आहे. 
 या वैद्यकीय महाविद्यालयासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या निधीविषयी सांगताना पालकमंत्री कु.तटकरे म्हणाल्या की, अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इमारत बांधकामासाठी तब्बल 406 कोटी 96 लाख 68 हजार 336 रुपये खर्चाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक यंत्रसामुग्री, वैद्यकीय उपकरणे खरेदीकरिता 2 कोटी 98 लाख 53 हजार 798 रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. या महाविद्यालयातील अभ्यासवर्ग, प्रयोगशाळा, वाचनालय, वसतिगृह, प्रशासकीय इमारत आदि कामे पूर्ण होण्यासाठी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अलिबाग येथे मध्यवर्ती ग्रंथालय व व्याख्यान कक्षासाठी 11 कोटी 83 लक्ष 75 हजार 555 रुपये व 24 नर्सिंग निवासस्थानांच्या विशेष दुरूस्ती व नूतनीकरणासाठी 3 कोटी 62 लाख 57 हजार 626 रुपये अशी एकूण 15.46 कोटींची विकासकामे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी करण्यात येणार आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आवारातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संबंधित दुरुस्ती कामाकरिता जिल्हा नियोजन मधून रु.35 लाख तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पुस्तके व नियतकालिके खरेदीकरिता रु.63 लाख मंजूर करण्यात आले आहेत. 
       शेवटी पालकमंत्री कु. आदिती तटकरे यांनी अलिबाग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्यासाठी सर्व स्तरावर मोलाचे सहकार्य करणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे आणि खासदार सुनिल तटकरे या सर्वांचे आभार मानले.
      या पत्रकार परिषदेस रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, कार्यकारी अभियंता श्री.जगदिश सुखदेवे, तहसिलदार सचिन शेजाळ, पोलीस निरीक्षक शैलेश सणस, आरसीएफचे शांताराम देशमुख, भालचंद्र देशपांडे, प्रमोद देशमुख यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Related Post