कुकडी लाभक्षेत्रात खरिपाचे बंद केलेलेआवर्तन पूर्ववत करा श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांची मागणी !

श्रीगोंदा ​​​​ | संघर्षनामा न्युज 

लिंपणगाव( प्रतिनिधी ) - श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेल्या कुकडी लाभक्षेत्रात मागील महिन्यात आवर्तन अचानक बंद करण्यात आले ते आवर्तन पुन्हा पूर्ववत करावे, अशी मागणी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान मागील महिन्यात कुकडीचे श्रीगोंदा तालुक्याच्या पायथ्याशी असणारे आवर्तन संबंधित अधिकाऱ्यांनी धरण परिसरात पाऊस थांबल्याने अचानक बंद करण्यात आले. ते खरिपाचे हक्काचे आवर्तन जलसंपदा विभागाने पूर्ववत करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून जोर धरू लागले आहे .एकीकडे श्रीगोंदा तालुक्यात पाऊस धरसोड करताना दिसत आहे .वारंवार ढगाळ वातावरण  तयार होत आहे त्यामुळे आहे त्या पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होऊन विहिरी व कूपनलिकांच्या पाणी साठा संपुष्टात येत आहे असे संकट शेतकर्‍यांपुढे उभे राहत असताना अचानक उन्हाचा तडाखा देखील निर्माण होत आहे. त्यामुळे आहे त्या पाण्याचे देखील मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याच्या तक्रारी कुकडी लाभक्षेत्रात खालील शेतकऱ्यांमधून होत असून हक्काचे खरिपाची आवर्तन पुन्हा पूर्ववत करावे.

       दरम्यान गेल्या दोन महिन्यापूर्वी कुकडी लाभक्षेत्रातचे पाणी टेल टू हेड म्हणजे कर्जत, करमाळाकडे सोडण्यात आले होते. त्या लाभक्षेत्रात जवळपास पंचवीस दिवस आवर्तन चालू ठेवण्यात आले. तो कालावधी संपल्यानंतर श्रीगोंदा तालुक्यात आवर्तन सोडण्याचा निर्णय होत असतानाच जलसंपदा विभागाने धरण परिसरात पाऊस थांबण्याचे कारण पुढे करत खरिपाचे चालू आवर्तन बंद केले. वास्तविक पाहता खरिपाचा हंगाम अंतिम टप्प्यात असताना कुकडीच्या आवर्तनची शेतकऱ्यांना नितांत गरज होती. कारण पावसाळा सुरु होऊन जवळपास चार महिने उलटले. परंतु पावसाने म्हणावा तसा प्रतिसाद तालुक्यात दिला नसल्यामुळे शेतकरी आधीच चिंतातूर आहेत. किमान आपल्याला कुकडीचे खरीप हंगामला पाणी मिळेल, ही अपेक्षा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होती. परंतु ती काही क्षणातच अपेक्षाभंग ठरली. आणि कुकडीचे श्रीगोंदा तालुक्यात सुटणारे पाणी अचानक बंद झाले. तालुक्यातील सर्वच नेतेमंडळींनी श्रीगोंदा तालुक्यातील पाणी पातळीची व खरीप हंगामाची व्यथा संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांसमोर मांडल्या. त्यांनी देखील आश्वासने दिली. परंतु वरिष्ठ पातळीवरून आवर्तन बंदचा निर्णय झाल्यानंतर शेतकऱ्यांसह नेते मंडळी देखील अवाक झाली. हे असे अघटित घडले कसे? असा प्रश्न सर्वांनाच पडला. त्यामुळे आता तर पावसाने पुन्हा उघडीप दिल्याने तालुक्यातील विशेषता कुकडी लाभक्षेत्रात पाणीटंचाई आतापासूनच मोठ्या प्रमाणात जाणताना दिसत आहे.

       आता पावसाचे काही महिने उरले आहेत. त्यामध्ये जोरदार पाऊस पडला तरच तालुक्यातील पाणी प्रश्न कुठेतरी शितील होऊ शकतो, अन्यथा या लाभक्षेत्रात सर्वांनाच पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावू भेडसावणार आहेत अशा प्रतिक्रिया देखील कुकडी लाभक्षेत्रात खालील शेतकऱ्यांमधून व्यक्त केल्या जात आहेत. त्यामुळे तालुक्याच्या हक्काचे खरिपाचे पाणी पुन्हा पूर्ववत केले, तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. सद्यस्थितीला मिळालेल्या माहितीनुसार येडगाव 69.51, माणिकडोह 27.76 ,वडज 13.30, पिंपळगाव जोगे 40.71, तर डिंबे धरण 78.87 अशाप्रकारे धरण क्षेत्रातील पाणी साठा उपलब्ध आहे .सध्या डिंबे धरणातील ओव्हरफ्लो चे पाणी घोड नद्यांमध्ये सोडण्यात येत असल्याची माहिती देखील समोर येत आहे. तेच ओवरफ्लोचे पाणी येडगाव धरणात सोडून कुकडी लाभक्षेत्रात हे पाणी पूर्ववत केले ,तर कुकडी लाभक्षेत्रात खालील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकतो. परंतु हा निर्णय कालवा सल्लागार समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्याची अंमलबजावणी केली तर निश्चितपणे श्रीगोंदा तालुक्यात खरिपाचे बंद केलेले आवर्तनची भर कुठेतरी भरून निघेल. आणि तूर्त पाणी प्रश्न मार्गी लागू शकतो असा तर्कही कुकडी लाभ क्षेत्राखालील शेतकऱ्यांमधून होत आहे निश्चितच श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी लाभक्षेत्रात पाणी टंचाईच्या झळा आता हळूहळू तीव्र होताना दिसत आहेत.

Related Post