संघर्षनामा वृत्तसेवा । गुंडेगाव
दि . २९ऑक्टोबर २०२६
वाळकी प्रतिनिधी :- हिवाळ्याच्या सुरुवातीपासूनच तालुक्यातील गुंडेगाव येथे पाणी टंचाईचे चटके जाणवत असून नागरिकांच्या घशाला कोरड पडत आहे. त्यामुळे गुंडेगावातील पाणी टंचाईचा प्रश्न सुटावा यासाठी अहिल्यानगर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अक्षय गार्डे यांनी दुष्काळाच्या अनुषंगाने गुंडेगाव येथील मुख्य तलाव तसेच परिसरातील काही जुन्या विहीर तसेच मुख्य बारवाची पाहणी केली.गावातील काही विहीर अशा आहेत ज्याचे क्षेत्रफळ मोठे असून काही वर्षांपूर्वी त्यात पाण्याची उपलब्धता चांगली होती परंतु या विहिरी आता पडीक आहेत असे काही स्थानिकांनी अक्षय गार्डे यांना सांगितले.
यावेळी पाणी टंचाई अनुषंगाने गटविकास अधिकारी यांनी गुंडेगाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी सचिन शिंदे व प्रशासक सचिन चौधरी यांना सुचना केल्या असून गुंडेगाव येथील गावठाण परिसर,धावडेवाडी,चौधरवाडी,कुताळमळा,हराळमळा,तुकाईमळा,कासारमळा,मानेमळा, कोतकर मळा येथील विहिरीची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी ग्रामविकास अधिकारी शिंदे यांना पाणी पुरवठा व साठवण याविषयीचे व्यवस्थित आराखडा तयार करण्यास सांगितले. तसेच हे पाणी एकत्रितपणे गोळा करून गावातील पाणी पुरवठ्याच्या मुख्य प्रणालीमध्ये कसे टाकता येईल याबाबत अभ्यास करण्याचे निर्देश दिले. ह्या सर्व विहिरीतून साधारण किती पाणी टाकण्यात येईल तसेच पाणी पुरवठा विहिरीतील स्वच्छता याबाबत सूचना केल्या.
यावेळी पाणी टंचाईची पाहणी करण्यासाठी पंचायत समिती अधिकारी प्रविण वाळके, सचिन चौधरी, सचिन शिंदे, ग्रामस्थ रावसाहेब हराळ, पत्रकार संजय भापकर,विनोद संकट,अमोल गाढे व इतर अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
चौकट..
उन्हाच्या तिव्रतेने तालुक्यातील गावांमध्ये जनतेचा पाणी टंचाईने घसा कोरडा पडलेला आहे. दुसरीकडे पाणी पुरवठा करणारे तलाव, विहिरी, बोअरवेल पाणी नसल्याने बंद स्थितीत आहेत. त्यामुळे जनता टंचाईने होरपळल्या जाऊ नये म्हणून पाणी टंचाईच्या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने विचार करून हा पाहणी दौरा महत्त्वाचा आहे.गावां गावात पाणी टंचाई चटके जाणवत असल्याने तालुक्यातील गुंडेगाव सह परिसरातील गावांतील प्रस्ताव पंचायत समितीकडे दाखल करण्यात आले आहेत ते तात्काळ पुढील कार्यवाही साठी तहसील कार्यालयात पाठवण्यात आले असून टंचाई ग्रस्त गावांना लवकरच टँकर द्वारे पाणीपुरवठा करण्यात येईल.
अक्षय गार्डे - गटविकास अधिकारी,प.समिती ,नगर.
चौकट..
गुंडेगाव परिसरात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. गावातील व वाडी वस्तीवर पाणीस्रोतांची उपलब्धता कमी झाली असून, विहिरी व बोअरवेल कोरडे पडले आहेत. परिणामी पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.तहसीलदारांनी गावाची पाहणी करून परिस्थितीची तातडीने दखल घ्यावी आणि ग्रामस्थांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी त्वरित पाणी टँकर सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रशासनाने विलंब न करता आवश्यक कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा.
संजय भापकर- ग्रामस्थ,गुंडेगाव.