जलवाहिनीवरच कचऱ्याचा डोंगर; नवनागापूर ग्रामपंचायतीचा अनागोंदी कारभार?

संघर्षनामा वृत्ततेवा । श्रीगोंदा

दि . २९ ऑगस्ट २०२६

नवनागापूर । प्रतीनिधी

अहिल्यानगर : मुळा धरणातून अहिल्यानगर शहर तसेच सैनिकी छावण्यांना होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या मुख्य जलवाहिनीवरच नवनागापूर ग्रामपंचायतीकडून अवैध कचरा साठविला जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब (बंडूनाना) सप्रे यांनी केला आहे. कचरा उचलण्यासाठी जेसीबीचा वापर करताना मुख्य जलवाहिनीला वारंवार धक्का लागून ती क्षतिग्रस्त होत असल्याने पाणीगळती होत असून, कचरा व सांडपाण्याच्या संपर्कामुळे पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मुळा धरणावरून अहिल्यानगरकडे येणाऱ्या शुद्ध पेयजल वाहिन्या नगर–मनमाड रस्त्यालगतून पुढे जातात. एमआयडीसी परिसरातील जलशुद्धीकरण प्रकल्पानंतर ही जलवाहिनी नवनागापूर परिसरातून पुढे सैनिकी छावणी तसेच अहिल्यानगर शहराला पाणीपुरवठा करते. मात्र, चेतना कॉलनी परिसरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ मुख्य जलवाहिनीच्या वरच कचरा साठविण्याची जागा करण्यात आल्याचा आरोप सप्रे यांनी केला आहे.

नवनागापूर ग्रामपंचायत व एमआयडीसी परिसरातील कचरा येथे आणून साठविला जातो आणि त्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने तो उचलला जातो. या प्रक्रियेत जेसीबीच्या बकेटमुळे जलवाहिनीला इजा होऊन पाणीगळती होत असल्याचा दावा सप्रे यांनी केला. जलवाहिनी फुटून त्याठिकाणी कचरा व दूषित पाणी साचल्यास त्याचा परिणाम पुढे जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यावर होण्याची शक्यता असल्याने हा विषय अत्यंत गंभीर असल्याचे त्यांनी नमूद केले.

ग्रामसभेत मुद्दा उपस्थित, निर्णय न झाल्याचा आरोप

दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी नवनागापूर ग्रामपंचायतीत झालेल्या ग्रामसभेत ग्रामपंचायत सदस्य आप्पासाहेब (बंडूनाना) सप्रे यांनी हा प्रश्न उपस्थित केला. जलवाहिनीच्या सुरक्षेला धोका निर्माण करणारा कचरा तातडीने हटवावा आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी त्यांनी संबंधित अधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसमोर केली. मात्र, या गंभीर विषयावर अपेक्षित निर्णय झाला नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

मुख्य जलवाहिनीच्या ठिकाणी कचरा साठविणे तात्काळ बंद झाले पाहिजे. शहरातील नागरिकांसह सैनिकी छावण्यांना सुरक्षित व शुद्ध पाणीपुरवठा होणे अत्यावश्यक आहे. हा विषय केवळ ग्रामपंचायतीपुरता मर्यादित नसून सार्वजनिक आरोग्य आणि राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे,असे सप्रे यांनी सांगितले.

कचरा डेपो हटवा, अन्यथा कठोर कारवाई करा :-जलवाहिनीच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून कचरा डेपो हटवावा, जलवाहिनीची तपासणी करावी आणि घनकचरा व्यवस्थापनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी सप्रे यांनी केली आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून सैनिकी छावणीतील संबंधित अधिकाऱ्यांचेही लक्ष वेधणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, या आरोपांची संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जलवाहिनीच्या सुरक्षिततेबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करणे गरजेचे आहे. तसेच पाणी दूषित होत असल्याचा दावा असल्याने संबंधित यंत्रणेकडून जलवाहिनी व पाण्याचे नमुने तपासून वस्तुस्थिती समोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे.

Related Post