तलवारीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या चार आरोपींना ७ वर्षे सक्तमजुरी,श्रीगोंदा न्यायालयाचा निकाल

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि . २७ ऑक्टोबर २०२६

श्रीगोंदा: काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील संतवाडी शिवारामध्ये शेतातील वेड्या बाभळीची झाडे काढण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून, फिर्यादी व साक्षीदारावर तलवारीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या चारही आरोपींना श्रीगोंदा येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने मुख्य आरोपींसह सर्व ४ आरोपींना आयपीसी कलम ३०७ (जीवे मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत ७ वर्षे सक्त कारावासाची आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, १५ मे २०१७ रोजी फिर्यादी अंकुश बापुराव खोरे (वय ६०, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) हे आपल्या शेतात जेसीबीच्या साहाय्याने मशागत करून वेड्या बाभळीची झाडे काढत होते. याचा राग मनात धरून आरोपींनी "तू जेसीबीने बाभळी का काढतोस, यामुळे आमच्या पाईपचे नुकसान होईल" असे म्हणून फिर्यादी व साक्षीदारांशी वाद घातला. सर्व आरोपींनी संगनमत करून त्यांना शिवीगाळ व दमदाटी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

यादरम्यान आरोपी क्रमांक १ अशोक गोविंद पाचपुते याने फिर्यादींचे साक्षीदार पांडुरंग अंकुश खोरे यांच्या डोक्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले व जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा वार अडवत असताना पांडुरंग खोरे यांच्या डाव्या हाताच्या बोटाला गंभीर दुखापत होऊन ते फॅक्चर झाले. घटनेनंतर आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली तलवार नाहीशी करून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३०६/२०१७ नुसार विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोने आणि पोलीस उपनिरीक्षक एस. एस. पाटील यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकारी वकील के. जी. केसकर यांनी सरकार पक्षातर्फे खटल्याचे कामकाज पाहिले, तर कोर्ट ऑर्डली म्हणून पोलीस हवालदार (बकल नंबर १७३५) एन. आय. नरुटे यांनी सहकार्य केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने खालीलप्रमाणे शिक्षा सुनावली:

१) आरोपी १ ते ४ (अशोक गोविंद पाचपुते, नानासाहेब राजाराम पाचपुते, दीपक अशोक पाचपुते, दत्ता गोविंद पाचपुते) यांना आयपीसी कलम ३०७ सह ३४ अन्वये प्रत्येकी ७ वर्षांचा सक्त कारावास आणि प्रत्येकी १,००० रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त सक्त कारावास भोगावा लागेल.

२) सर्व चारही आरोपींना आयपीसी कलम ५०६ (गुन्हेगारी धमकी) सह ३४ अन्वये प्रत्येकी २ वर्षांचा सक्त कारावास आणि प्रत्येकी ५०० रुपये दंड सुनावण्यात आला. दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त सक्त कारावास होईल.

३) आरोपी क्रमांक १ अशोक गोविंद पाचपुते याला पुरावा नष्ट केल्याप्रकरणी आयपीसी कलम २०१ अन्वये स्वतंत्रपणे २ वर्षांचा सक्त कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. दंड न भरल्यास १ महिन्याचा अतिरिक्त सक्त कारावास भोगावा लागेल.

या सर्व शिक्षा आरोपींना एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. श्रीगोंदा पोलिसांच्या चोख तपासामुळे आणि सरकारी वकिलांच्या प्रभावी युक्तिवादामुळे आरोपींना शिक्षा मिळवून देण्यात यश आले आहे.

Related Post