ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला रेडियम आणि रिफ्लेक्टर बसवणे बंधनकारक: श्रीगोंदा पोलिसांचे साखर कारखान्यांना निर्देश

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .२७ऑक्टोबर २०२६

प्रतिनिधी,

श्रीगोंदा: ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्समुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सुभाष सानप यांनी तालुक्यातील साखर कारखान्यांना कडक निर्देश दिले आहेत.

सध्या कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला असून श्रीगोंदा, दौंड आणि कर्जत तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर ट्रॅक्टरद्वारे ऊसाची वाहतूक केली जाते. जामखेड-न्हावरा आणि दौंड-अहिल्यानगर हे मुख्य हायवे श्रीगोंदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात, जिथे वाहनांची मोठी वर्दळ असते. गेल्या काही वर्षांत ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सना रिफ्लेक्टर न लावल्यामुळे आणि वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे गंभीर अपघात होऊन मनुष्यहानी झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

                      चौकट

या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासनाने कारखान्यांच्या व्यवस्थापकांना (मॅनेजर) पत्र पाठवून त्वरित पावले उचलण्यास सांगितले आहे.कारखान्यांनी ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक आणि मालक यांची तात्काळ बैठक घ्यावी. परिवहन विभागाच्या नियमांनुसार सर्व ट्रॅक्टर आणि ट्रॉलीच्या पाठीमागील बाजूस रेडियम आणि रिफ्लेक्टर बसवणे अनिवार्य करावे, तसेच ट्रॅक्टर मध्ये गाण्यांचा टेप लावणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

अपघात विरहित वाहतुकीसाठी कारखान्यांनी आपल्या स्तरावर तातडीने मोहीम आखावी आणि त्याची माहिती पोलीस प्रशासनाला कळवावी. नियमांचे उल्लंघन झाल्यास किंवा निष्काळजीपणामुळे कोणतीही अनुचित घटना घडल्यास संबंधित घटकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही श्रीगोंदा पोलिसांनी दिला आहे.

          सुभाष सानप, पोलीस निरीक्षक श्रीगोंदा

Related Post