बेलवंडी पोलिसांची धडाकेबाज कारवाई ,गावठी कट्टा,चार जिवंत काडतुसे व तलवार बाळगणाऱ्या आरोपीस अटक,

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .६ एप्रिल २०२६

प्रतीनिधी,

श्रीगोंदा तालुक्यातील विसापुर येथे बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्या एका सराईत आरोपीस बेलवंडी पोलिसांनी अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. आरोपीकडून गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे तसेच लोखंडी तलवार जप्त करण्यात आली आहे.

दिनांक 03 एप्रिल 2026 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विसापुर येथील सरस्वती विद्यालयाच्या मागील परिसरात अशोक लक्ष्मण कराळे (रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) हा इसम बेकायदेशीररित्या देशी बनावटीचा कट्टा व जिवंत काडतुसे बाळगून फिरत आहे.

या माहितीची तात्काळ दखल घेत सोनवलकर यांनी तपास पथकाला कारवाईचे आदेश दिले. पथकाने घटनास्थळी जाऊन संशयिताचा शोध घेतला असता, एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. त्यास ताब्यात घेऊन पंचांसमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्याकडून चार जिवंत काडतुसे आढळून आली.

त्यानंतर आरोपीच्या राहत्या घराची झडती घेतली असता, घरातील दिवाणाखाली एक लोखंडी तलवार सापडली. पुढील तपासात पोलीस कोठडीत असताना आरोपीकडून एक गावठी कट्टा (पिस्तूल) जप्त करण्यात आला.

आरोपी अशोक कराळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये महिलांशी संबंधित गुन्हे, अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन, दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हे तसेच इतर कायद्यांनुसार गुन्ह्यांचा समावेश आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लूबमे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणकुमार लोखंडे (कर्जत विभाग) तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे, पो.हे.कॉ. भाडुसाहेब यमगर, रविंद्र औटी, भाऊसाहेब शिंदे, शरद गांगर्ड, विनोद पवार, दादासाहेब क्षिरसागर, रवि जाधव, भापकर आदींनी सहभाग घेतला.

सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन गाजरे हे सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Related Post