गावागावांच्या राजकारणात विभागला देव, देवा तुला शोधू कुठे ?

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि .५ एप्रिल २०२६

संपादकिय,

गावोगावी उभारलेली देवस्थानं ही केवळ श्रद्धेची केंद्रं नसून, ती गावाच्या संस्कृतीची, एकतेची आणि परंपरेची जिवंत ओळख असतात. पण आज चित्र काही वेगळंच दिसत आहे. देवा तुला शोधू कुठे? असा हतबल प्रश्न विचारण्याची वेळ सामान्य भक्तांवर आली आहे, याहून दुर्दैव काय असू शकतं?

एकेकाळी जत्रा म्हणजे भक्तीचा उत्सव, गावाच्या एकोप्याचं प्रतीक. आज त्याच जत्रा राजकारणाच्या अखाड्यात बदलताना दिसतात. जेवढं मोठं देवस्थान, तेवढं मोठं राजकारण ही वस्तुस्थिती आता कुणालाही नाकारता येणार नाही. ट्रस्ट, वर्गणी, देणग्या - या सगळ्यांभोवती फिरणारं सत्तासंघर्षाचं राजकारण देवस्थानांना पोखरत आहे.

भक्तांच्या श्रद्धेने जमा झालेला पैसा हा देवाच्या कार्यासाठी, समाजोपयोगी उपक्रमांसाठी वापरला जावा अशी अपेक्षा असते. मात्र, अनेक ठिकाणी हाच पैसा गटबाजी, भ्रष्टाचार आणि स्वार्थासाठी वापरला जातोय, अशी खंत व्यक्त केली जाते. हिशोबात पारदर्शकता नाही, निधीचा वापर संशयास्पद -आणि यामुळे निर्माण होणारे वाद थेट न्यायालयाच्या दारात पोहोचतात. काही गावांमध्ये तर देवाच्या नावावरूनच दोन गट, दोन जत्रा आणि थेट मारामाऱ्या - ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे.

देवस्थान ही गावाची इज्जत असते. पण आज हीच इज्जत चव्हाट्यावर मांडली जात आहे. श्रद्धेचं राजकारण केलं जातंय, भक्तीला बाजूला सारून सत्ता आणि पैसा यांची चढाओढ सुरू आहे. भाव, भक्ती, श्रद्धा टांगणीला लागल्याचं चित्र स्पष्ट दिसतं.

याच वेदनेतून आज प्रत्येक भक्ताच्या मनात एक हाक उमटते -

यामंडळींना सद्बुद्धी देशील काय? चमत्कार दाखवशील काय? देवा तुला शोधू कुठे?

हा प्रश्न केवळ आर्त नाही, तर समाजाच्या विवेकाला जागवणारा आहे. कारण देवाकडे चमत्कार मागण्याऐवजी आपणच आपल्या वर्तनात बदल घडवून आणला, तर तोच खरा चमत्कार ठरेल.

या सर्व पार्श्वभूमीवर प्रश्न उभा राहतो -दोष देवाचा आहे का? की आपल्या विकृत होत चाललेल्या मानसिकतेचा? देव कधीच विभागला नाही, पण आपण मात्र त्यालाही गटांमध्ये विभागलं. देवाच्या नावावर चालणाऱ्या या आघोरी प्रकारांना आळा घालणं ही काळाची गरज आहे.

यासाठी काही मूलभूत बदल आवश्यक आहेत. देवस्थान ट्रस्टमध्ये पारदर्शकता, नियमित लेखापरीक्षण, सर्व समाजघटकांचा सहभाग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे - राजकारणापासून दूर राहण्याची ठाम भूमिका. गावकऱ्यांनीही सजग राहून देव आणि देवाचा पैसा याचा सन्मान राखणं गरजेचं आहे.

देव कुठेच हरवलेला नाही. तो अजूनही तिथेच आहे - भक्तांच्या शुद्ध भावनेत, निस्वार्थ सेवेत आणि प्रामाणिक श्रद्धेत. हरवलंय ते आपलं भान, आपली नितीमत्ता.

आज गरज आहे ती देवाला शोधण्याची नाही, तर आपल्या मनातल्या श्रद्धेला जागवण्याची. अन्यथा उद्या इतिहास आपल्यालाच विचारेल 

देव नव्हे, माणूस हरवला होता… आणि त्याला शोधायला कोणीच उरलं नव्हतं.

Related Post