संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.१५.जुलै २०२६
प्रतिनिधी,
राहुरी, डिग्रज: मिरची पिकावर बोकड्या अर्थात कोकडा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे. जीवापाड जपलेला मिरचीचा प्लॉट कोकडा रोगामुळे डोळ्यासमोर जळतोय. हे चित्र शेतकऱ्यांसाठी वेदनादायी आहे.
*आयत्या वेळी भाव घसरतो*: बहुतेक शेतकरी मे-जून महिन्यात मिरचीची लागवड करतात. यामुळे एकाचवेळी उत्पादन होते. मागणीपेक्षा पुरवठा वाढताच बाजारात मिरचीचे दर घसरतात.
*पीक संरक्षणासाठी उधारीवर फवारण्या अन महागडी खत*: शेतकऱ्यांसाठी आता कोणतीही पीक घेणे आर्थिकदृष्ट्या खूप कठीण झाले आहे. कारण पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होतोच. रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी महागड्या कीटकनाशकांची फवारणी करणे शेतकऱ्यांना क्रमप्राप्त ठरते. वेळप्रसंगी शेतकरी उधारीवर कीटकनाशक खरेदी करत असतात.
*जमिनीतून व फवारणीतून कुठली खते, औषधे द्याल*?
मिरचीला जमिनीतून शेणखत, गांडूळ खत, तसेच एनपीके हे रासायनिक खत द्यायला हवे, तर सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खतांची फवारणीद्वारे मात्र द्यावी, असा सल्ला शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांनी दिला.
*शेतकऱ्यांनी एकरी ३५ हजारांचा खर्च केला, हातात 60 हजार*: मिरची पिकासाठी एकरी सुमारे 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. यात विशेषतः मल्चिंग, ठिबक आणि कीटकनाशक फवारणीचा खर्च अधिक असतो. खर्च अधिक असला तरी जून ते जुलै या दोन महिन्यांत शेतकऱ्यांना बऱ्यापैकी भाव मिळतो. शिवाय सुमारे पाच महिने पिकांचे उत्पादन मिळते.
*प्रकार* *प्रति किलो भाव*
हिरवी मिरची - ४० ते ५० रुपये
लवंगी मिरची - ७० रुपये
ढोबळी मिरची - ६० रुपये
लाल मिरची - १८० रुपये
अशी माहिती शास्त्रज्ञ डॉ. वैष्णवी डोळस यांनी दिली.
*बंदोबस्त कसा कराल*?
पिकाचे नियमित निरीक्षण करणे आणि झाड काय बोलतोय हे नियमितपणे त्याच्याकडे जाऊन आपण त्याला निरीक्षण करणे. तसेच किडींचा प्रादुर्भाव दिसल्यास त्वरित उपाययोजना करणे. मिरचीवरील कोकड्यांचा बंदोबस्त करण्यासाठी रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून ते जाळून टाकावे. रसशोषक किडींचा नियंत्रणासाठी रासायनिक किंवा जैविक कीटकनाशकांचा वापर करावा रोगप्रतिकारशक्ती अधिक असलेल्या वाणांची लागवड करावी व रोपे घेतल्यास ते रोपे निरोगी व रोग व किडींचा प्रादुर्भाव नसलेली घ्यावी असा सल्ला शास्त्रज्ञ डॉ. अमोल विरकर यांनी केले.
*बोकड्याने शेतकरी हैराण, रोगाची कारणे काय*?
मिरची पिकावरील बोकड्या (कोकडा) रोगाचे मुख्य कारण म्हणजे विषाणूजन्य संसर्ग. हा रोग प्रामुख्याने मावा, पांढरीमाशी, फुलकिडे आणि तुडतुड्यांसारख्या रसशोषक किडींमुळे पसरतो असे प्रतिपादन शास्त्रज्ञ डॉ. विपुल माळी यांनी केले.
*जिल्ह्यात राहुरी तालुक्यात सर्वाधिक मिरचीची लागवड:*
अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे १५ ते २० हजार हेक्टरवर मिरचीची लागवड केली जाते. यात मिरचीची सर्वाधिक क्षेत्र मालेगाव तालुक्यात ६ ते ८ हजार हेक्टर असते, अशी माहिती डॉ. अमोल विरकर यांनी दिली.