कॉम्प एक्स सारख्या प्रदर्शनांमुळे विदर्भ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे!

संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा 

दि.१९जाने.२०२५

प्रतिनिधी,

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर येथे आयोजित कॉम्प-एक्स 2025 प्रदर्शनास भेट दिली.

याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विदर्भवासियांसाठी आयटी, गॅजेट्स, गेमिंग, सॉफ्टवेअर, एआयसारख्या इमर्जिंग तंत्रज्ञानाचे केंद्र कॉम्प एक्स च्या रुपात मिळाले. गेमिंग क्षेत्र सतत विस्तारत असून यातून मूल्य आणि रोजगार निर्मिती होत आहे. याची सुरुवात कॉम्प एक्स ने केली याचा आनंद वाटतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या ३१ वर्षांपासून सातत्याने कॉम्प एक्स प्रदर्शनाचे आयोजन केल्याबद्दल अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा एआय संपूर्ण जग बदलत असून आपण ते आत्मसात करणे गरजेचे आहे. यासाठी आपल्या सरकारने गुगलसमवेत MoU केला आहे. यानुसार नागपूर येथील ट्रीपल आयआयटी येथे सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ची स्थापना करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्र स्टार्टअपच्या संख्येसह मूल्याच्या बाबतीतही कर्नाटक आणि बंगळुरुला मागे टाकून क्रमांक एकवर पोहोचला आहे. देशातील सर्वाधिक युनिकॉर्न महाराष्ट्रात आहेत. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत आहे. मुंबई देशाच्या आर्थिक राजधानीसह फिनटेक कॅपिटलही झाली आहे, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

कॉम्प एक्स सारख्या प्रदर्शनांमुळे विदर्भ तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे राहतो, अशा शब्दात मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी गौरव केला.

याप्रसंगी कॉम्प एक्स 2025 प्रदर्शनाचे आयोजक विदर्भ कॉम्प्युटर ऍण्ड मिडिया डिलर्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Related Post