संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२०ऑगस्ट २०२४
लिंपणगाव (प्रतिनिधी)- सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या स्वीकृत संचालकपदी रमजान हवालदार यांची निवड झाल्याने श्री व्यंकनाथ विद्यालयाकडून प्राचार्य श्री आनंदा पुराने सर यांनी श्री हवालदार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे संचालक डी. आर. आबा काकडे हे होते.
व्यासपीठावर स्कूल कमिटीचे सदस्य अकबरभाई इनामदार; बाळासाहेब जठार; लियाकत तांबोळी; प्राचार्य आनंदा पुराने सर; नंदकुमार नागवडे आदींसह विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शनपर भाषणात उपशिक्षक संभाजी इथापे यावेळी बोलताना म्हणाले की; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये संचालक मंडळात रमजान हवालदार सर यांच्या माध्यमातून स्थान देऊन अल्पसंख्यांक समाजाला न्याय दिला; श्री हवालदार सर हे जिल्ह्यातील शिक्षकांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. शिक्षकांच्या प्रत्येक प्रश्नात हवालदार सर हे विशेष लक्ष देऊन प्रश्न सोडवतात असे सांगून श्री इथापे यांनी गुणगौरव केला.
सत्काराला उत्तर देताना नवनिर्वाचित संचालक रमजान हवालदार यावेळी म्हणाले की; नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र दादा नागवडे यांनी मला सहकारात काम करण्याची संधी दिली. त्यामुळे मी नागवडे कुटुंबाचा ऋणी आहे. विधानसभेला नागवडे कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून काम करू सौ अनुराधाताई नागवडे यांना आमदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही. असे सांगून श्री हवालदार सर पुढे म्हणाले की; माझा हा बहुमान संस्थेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतरांचा आहे; असे सांगून विद्यालयाने जो सन्मान केला त्याबद्दल विद्यालयाचे श्री हवालदार सर यांनी आभार व्यक्त केले.
अध्यक्षस्थानावरून बोलताना नागवडे कारखान्याचे संचालक डी आर काकडे म्हणाले की; नवनिर्वाचित संचालक श्री हवालदार सर आणि माझी महाविद्यालयीन जीवनापासून मैत्री आहे. त्या काळापासून आम्हाला हवालदार सर यांचे योग्य मार्गदर्शन मिळाले शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ व्यक्तिमत्वाला नागवडे कारखान्यात राजेंद्र दादा नागवडे यांनी संधी दिल्याने निश्चितच आमच्या दृष्टीने अभिमानास्पद बाब असल्याचे श्री काकडे यांनी यावेळी सांगितले.
सूत्रसंचालन उपशिक्षक संभाजी इथापे यांनी केले. तर विद्यालयाचे प्राचार्य आनंदा पुराणे यांनी आभार मानले.