अण्णाभाऊ साठे हे क्रांतिकारी साहित्यिक- डॉ.बळे

संघर्षनामा न्यूज l श्रीगोंदा 

दि.३ऑगस्ट २०२४

प्रतिनिधी,


 जातीच्या अन्यायाची जाणीव करून देणे आणि त्याविरोधात लढण्यासाठी उद्युक्त करणे हेच अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचे उद्दिष्ट होते.  असे प्रतिपादन डॉ. बाळासाहेब बळे यांनी केले ते राहुल विद्यार्थी वसतिगृह श्रीगोंदा येथे आयोजित करण्यात आलेल्या अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी समाजसेवक दादासाहेब शिरवाळे होते.यावेळी विनायक ससाने सर. पत्रकार मुस्ताक पठाण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. ते पुढे म्हणाले अण्णाभाऊंच्या साहित्याने महाराष्ट्रात घडवून आणलेल्या परिवर्तनाविषयी, जागर होणे गरजेचे आहे.प्रतिकाराचे दुसरे नाव संघर्ष होय. अण्णा भाऊ साठे यांचे संपूर्ण आयुष्य संघर्षात गेले. वाटेगाव ते मॉस्कोपर्यंतचा प्रवास हा त्यांच्या संघर्षाचा पुरावाच होय. अण्णाभाऊंचा जन्म ज्या वाटेगाव परिसरात झाला त्या भागात अनेक क्रांतिकारकांनी जन्म घेतला होता. एखाद्या विचारप्रणालीचा स्वीकार हा बहुधा त्या व्यक्तीच्या पार्श्वभूमीवर अवलंबून असतो. अण्णाभाऊंना भाकरीचा प्रश्न महत्त्वाचा वाटला. त्या प्रश्नाच्या अनुषंगाने येणाऱ्या कामाचे महत्त्व सांगणाऱ्या मार्क्सवादी तत्त्वज्ञानाचा परिचय त्यांना झाला आणि त्यातूनच ते मार्क्सवादाकडे वळले. त्यामुळे त्यांना जात जाणिवेबरोबरच वर्गजाणीवही होऊ लागली. त्यांच्या अनेक कथा कादंबऱ्यावर चित्रपटाची निर्मिती झाली. असा एक बहुआयामी साहित्यिक महाराष्ट्राला मिळणे हे महाराष्ट्राचे भाग्यच होय असे ही ते म्हणाले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश ओहोळ यांनी केले तर आभार प्रसाद भैलुमे यांनी मानले

Related Post