वागजाई क्लास तांदळी दुमाला येथे बाल आनंदी बाजार व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम उत्साहात संपन्न !

संघर्षनामा वृत्तसेवा । श्रीगोंदा

दि १६ डिसेंबर २०२५

प्रतिनिधी ,

 वागजाई क्लास, तांदळी दुमाला येथे बाल आनंदी बाजार व गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रमाचे अत्यंत उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तांदळी दुमाला ग्रामपंचायतीचे सरपंच संजय अण्णा निगडे हे होते, तर अग्निपंख फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब काकडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. वर्षा दत्तात्रय भोस तसेच कुस्तीपटू गायत्री संतोष हराळ यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच शालेय व्यवस्थापन समिती (SMC) चे नूतन अध्यक्ष रामदास गंगाधरे, माजी अध्यक्ष संदीप घाडगे व सर्व सदस्यांचाही सत्कार करण्यात आला.

बाल आनंदी बाजार या उपक्रमात सरपंच संजय अण्णा निगडे, प्रमुख पाहुणे बाळासाहेब काकडे, तसेच माणिक हराळ, निलेश शेळके, राजेंद्र भोस व रामदास गंगाधरे यांनी प्रत्येकी ५०० रुपये खर्च करून बालकांकडून भाजीपाला खरेदी केला. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व आत्मविश्वासाचे हसू फुलले.

कार्यक्रमात शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. सुहास शेळके यांनी आपल्या मातोश्री कै. चंद्रकला इंद्रभान शेळके यांच्या स्मरणार्थ शालेय मैदानात पेवर ब्लॉक बसवून देण्याची घोषणा केली. तर सरपंच संजय अण्णा निगडे यांनी शाळेसाठी भौतिक सुविधा व कंपाऊंड उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले. यासोबतच शाळेचे सुशोभीकरण करण्याचा शब्द अग्निपंख फाउंडेशनकडून देण्यात आला.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उपसरपंच वैशाली हराळ, माजी सरपंच हौसराव बोरुडे, डी. टी. भोस, महेश भोस, संदीप घाडगे, रामदास गंगाधरे, तसेच सर्व पालक व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र भोस यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती रेवगे मॅडम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध व आनंदी वातावरणात पार पडून विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांच्या मनात सकारात्मक संदेश देऊन गेला.

Related Post