संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि. १८ नोव्हेंबर २०२५
प्रतिनिधी,
जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी पडत असून जिल्ह्याचे किमान तापमान १० सेल्सिअस पेक्षा कमी झाल्याचे भारतीय हवामान खात्याच्या हवामान केंद्रावरील नोंदीनुसार दिसून आलेले आहे. जिल्ह्यात दि.१८ नोव्हेंबर २०२५ रोजी तुरळक ठिकाणी तीव्र थंडीच्या लाटेची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून या कालावधीत जिल्ह्यातील किमान तापमानामध्ये घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले आहे.
थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामानाच्या अंदाजाची रेडिओ, टी.व्ही. व वर्तमानपत्रामध्ये प्रसारीत होणा-या बातम्यांद्वारे माहिती मिळवावी. हिवाळ्यामध्ये स्वेटर, मफलर, कानटोपी, हात व पायमोजे तसेच रग, चादर यासारखे इतर पुरेसे उबदार कपडे वापरावेत. थंडीची लाट आली असताना शक्यतो घरातच थांबावे, थंड वाऱ्यापासून बचावासाठी शक्यतो प्रवास टाळावा. स्वतःला कोरडे ठेवावे. शरीर ओले असल्यास त्वरीत कपडे बदलावे, ज्याद्वारे शरीरातील उष्णता कमी होणार नाही.
शरीराचे तापमान समतोल राखण्यासाठी निरोगी अन्न खावे. पुरेशी प्रतिकारशक्ती राखण्यासाठी व्हिटॅमिन - सी समृध्द फळे आणि भाज्या खाव्यात.
नियमितपणे गरम द्रव्य/पेय प्यावे, कारण यामुळे थंडी दरम्यान शरीरातील उष्णता कायम राहील. घरातील वृध्द लोकांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. थंडीत दीर्घकाळ राहिल्यास त्वचा निस्तेज आणि बधीर होऊ शकते. निस्तेज पडलेली हातापायांची बोटे, कानाची पाळी व नाकाचा शेंडा इ. लक्षणांकडे लक्ष द्यावे व अशा वेळी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. थंडीने शरीराचा थरकाप होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे शरीराचे तापमान कमी होण्याचे लक्षण असलेने तात्काळ खुल्या जागेतून निवा-याच्या ठिकाणी जावे. परिस्थिती बिघडत असल्यास तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. पाळीव प्राण्यांना घरामध्ये व सुरक्षित ठिकाणी हलवावे तसेच पशुधन किंवा पाळीव प्राण्यांचे थंड हवामानापासून संरक्षण करावे.
नागरिकांनी हिवाळ्याच्या कालावधीत स्वतःसह जनावरांचे थंडीपासून संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी. स्थानिक प्रशासनाद्वारे वेळोवेळी दिलेल्या सुचनांचे पालन करावे तसेच आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे आरोग्य केंद्र, रूग्णालय वा १०८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.