एक कलासक्त शिक्षक जी.एम.आंबेटकर सर.

संघर्षनामा न्यूज़। पाथर्डी 

दि. 10मे. 2023

पाथर्डी प्रतिनिधी राजेंद्र चव्हाण:

आपण जेव्हा माध्यमिक शिक्षण घेत असतो, तेव्हा आपल्याला बरंच काही व्हायचं असतं.आपणास शिकवणारे जे आवडते शिक्षक असतात. ते जो विषय शिकवत असतात, त्या विषयातच आपल्याला भविष्यकाळात काहीतरी करावा असं वाटत असतं किंवा त्या शिक्षकाप्रमाणेच आपण व्हावं असेही वाटत असते.

मी श्री आनंद विद्यालय,चिचोंडी- शिराळ या ठिकाणी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यावेळी मुख्याध्यापक म्हणून गंगाधर विष्णुपंत उर्फ ग.वि.कुलट सर कार्यरत होतें.इतर विषयासाठी बाफना सर, संचेती सर, धायतडक सर, देखणे सर, रूपनर सर,टाक सर यांच्या समवेतच जी.एम.आंबेटकर सर हे चित्रकलेचे शिक्षक होते.चित्रकला शिकवण्याची त्यांची आठवण अतिशय उत्तम आणि सजग अशी होती.म्हणून आम्हाला चित्रकला  विषय अतिशय आवडत असे.

त्यावेळी शाळेमध्ये एकदा चित्रकलेचे प्रदर्शन भरले होते.या चित्रकला प्रदर्शनाच्या वेळी हस्तकलेचे वेगवेगळे डिझाईन तयार करून त्याचेही प्रदर्शन लागलेले होते.चित्रकला आणि क्राफ्ट हे दोन विषय आंबेटकर सर आम्हाला शिकवत होते.तरी या प्रदर्शनात काडी पेटी पासून बनवलेल्या विविध वस्तू, कागदापासून घराच्या डिझाईन, कागदी हार आणि सर्व काही प्रदर्शनात मांडलेलं होतं.आंबेडकर सर चित्रकलेचा विषय शिकवतांना प्रथमतः सुरुवातीला  ऐतिहासिक गोष्टी सांगत आणि त्या वेळच्या चित्रकला, शिल्पकला कशा पद्धतीने कलात्मक दृष्ट्या कार्यरत होती, ते सांगत असत.विद्यार्थ्यांच्या डोळ्यासमोर ते हुबेहूब चित्र उभे करत असत.ऐतिहासिक गोष्टीबद्दल बोलायला सुरुवात करत, तेव्हा ते वर पाहून बोलत असत आणि अगदी शेवट च्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांची नजर जातं असे.त्यांचा भारदस्त आवाज सर्व विद्यार्थी एकाग्रतेने ऐकत असत.प्रत्यक्ष फळ्यावरती चित्र काढून चित्र कसे काढायचे, हे समजून सांगत असत.त्यानंतर आम्ही विद्यार्थी हे चित्र आपल्या चित्रकलेच्या वहीत काढत असे.त्यावेळी पेन्सिलकलर आणि रंगपेटी च्या रंगाने चित्राला रंग देण्याची पद्धत होती.पोस्टर कलर नव्याने आलेले होते. बहुतांशी विद्यार्थी रंग पेटीचा वापर करत.काही पोस्टर कलरचा वापर करत. कारण माझे वडिल शिक्षक असल्याने शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या सर्व नवनव्या गोष्टी ते आम्हाला उपलब्ध करून देत आणि म्हणून माझ्याकडे पोस्टर कलर असत.

आंबेटकर सर कधी कधी कागदावरही चित्र काढून दाखवित.त्यावेळी दहा वीस विद्यार्थी टेबलाच्या आजूबाजूने उभे राहून सर कसे चित्र काढतात ते पहात.मी कमी उंचीचा आणि किरकोळ देहयष्टीचां असल्याने सर्वात पुढे असे.मला टेबल जवळ उभा राहिल्यामुळे सर पेन्सिल कशी धरतात, इथपासून तर चित्रातील व्यक्तीला डोळे कसे काढतात याचे बारीक निरीक्षण करता येतं असे.या निरीक्षणातूनच मला चित्रकलेची आवड लागली.माझ्यासारखीच अनेक विद्यार्थ्यांना चित्रकलेची आवड केवळ आंबेटकर सरांमुळे लागली.त्यावेळी चित्रकलेच्या दोन परीक्षा होत.सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनामुळे वर्गातील किमान ५० टक्के मुले तरी या परीक्षेला बसत असत.या दोन्हीही परीक्षा पाथर्डी येथील तिलोक जैन विद्यालयात होतं.चित्रकलेच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांचे स्पेशलक्लास आणि तेही मोफत आंबेटकर सर घेत असत.सरांचा आवाज जरी कडक आणि करारी असला तरी सर मनाने अतिशय मृदू होते.कलावंत असल्याने मुडी असले तरी कोणत्याही विद्यार्थ्यांना त्यांनी कधी मारल्याचे अथवा रागावल्याचे मला आठवत नाही. पुढे काही दिवसानंतर सरांची चिचोंडी वरून माणिक दौंडी,पाथर्डीला बदली झाली.तरीही सर जेव्हा कधी चिंचोडीत भेटत, तेव्हा अतिशय आनंद वाटे. त्यावेळी बहुतांश वेळा नेहरू शर्ट आणि पायजमा किंवा पांढरी पँट ते घालत. त्यांनी चित्रकलेची आवड लावल्यामुळे कधी कधी मलाही चित्रकलेचा शिक्षक व्हावे असं वाटे, पण आपल्याला जे वाटतं तसं होताच येतं असं नाही.मी चित्रकला ही कला जोपासण्याचा प्रयत्न शेवगावी अगदी बी.कॉम.होईपर्यंत केला.त्यावेळची प्रसिद्ध नटी श्रीदेवीचे चित्र मी स्केल वापरून काढले होते.ते आणि इतर चित्र आजही माझ्या संग्रही आहेत.जेव्हा जेव्हा मी ते चित्र पाहत असे, तेव्हा तेव्हा मला आंबेटकर सरांची आठवण यायची, पण हायस्कूल नंतर सरांची कधीच भेट झाली नाही. असेच एकदा अहमदनगर येथे प्रा. डॉ. अशोक कानडे सर आंबेडकर सरांना माझ्याकडे घेऊन आले. त्यावेळी सर गाडीतून उतरत असतांनाच मी त्यांना ओळखलं आणि त्यांचा चरणस्पर्श केला. माझ्याबद्दल, माझ्या साहित्यिक  चळवळीबद्दल, आमच्या शब्दगंध साहित्यिक परिषदे बद्दल त्यांना कानडे सरांनी पूर्वकल्पना दिलेली असल्याबद्दल मुळे त्यांनाही मला भेटण्याची ओढ होती. पण ज्याला आपण भेटायला जातोय तो आपला विद्यार्थी असेल असे चुकूनही सरांना वाटते नाहीं.त्यामुळे त्यांना आश्चर्य वाटले.जवळपास तासभर एकत्र बसून आम्ही जुन्या आठवणींना उजाळा दिला.

काल ९ मे रोजी आंबेडकर सर आपल्या सर्वांना सोडून गेले, ही माहिती आमचे अहमदनगरचे प्रसिध्द चित्रकार,कला शिक्षक रविंद्र सातपुते सर आणि सतीश एडके यांनी दिली,तेव्हा सर्व आठवणी जाग्या झाल्या. असे कलासक्त उत्तमोत्तम शिक्षक विद्यार्थ्यांना लाभल्यास आयुष्यामध्ये यशस्वी होण्यासाठी वेळ लागणार नाही.हाडाच्या चित्रकार,कला शिक्षकाला आंबेडकर सरांना विनम्र अभिवादन.

*सुनिल गोसावी*

संस्थापक,सचिव,

*शब्दगंध साहित्यिक परिषद,* महाराष्ट्र राज्य

तथा 

*सहा.प्रकल्प अधिकारी*

देवळालीप्रवरा नगरपरिषद, ता. राहुरी. जि. अहमदनगर

Related Post