संघर्षनामा वृत्तसेवा l श्रीगोंदा
दि.२९ मार्च २०२५
प्रतिनिधी,
प्राथमिक आरोग्य केंद्र, नान्नज येथे रुग्णांच्याआरोग्यासंदर्भात प्रशासनाचे अपयश दिवसेंदिवस वाढत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. या केंद्रातील डॉक्टर आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत आपल्या जागेवर अनुपस्थित राहत असून, रुग्णांना योग्य सेवा मिळत नाही. कार्यालयात उपस्थित असले तरी जबाबदारी टाळून मनमानी वागणूक दिली जात आहे.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ता महादेव अरुण साठे यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी आपल्या 5 वर्षांच्या मुलीच्या तपासणीसाठी या केंद्रात भेट दिली असता, डॉक्टरांनी कोणतीही तपासणी न करता थेट औषध लिहून दिले आणि औषधही केंद्रात उपलब्ध नव्हते. याबाबत लेखी पुरावा असून, यावर तक्रार देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.
आरोग्य केंद्रात वेळेवर कर्मचारी उपस्थित नसल्याचे व्हिडीओ रेकॉर्डिंगद्वारे स्पष्ट झाले असून, हे आरोग्य विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. भारतीय संविधानातील मार्गदर्शक तत्वांनुसार शासनाचे कर्तव्य नागरिकांचे आरोग्य संवर्धन करणे आहे. परंतु, या केंद्रातील प्रशासनाने नागरिकांना अपमानास्पद वागणूक देऊन त्यांच्या मूलभूत हक्कांची पायमल्ली केली आहे.
चौकट
लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
सदर प्रकरणाची तक्रार तालुका आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे वेळोवेळी करण्यात आली आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. संबंधित डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांविरोधात कठोर शिस्तभंगाची कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी तसेच आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात येईल. यानंतरही कार्यवाही न झाल्यास स्थानिक नागरिक, सामाजिक संघटना व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.